Sat, Jul 20, 2019 23:43होमपेज › Kolhapur › गाडीअड्ड्यातील अतिक्रमणे 15 दिवसांत हटवणार : ढवळे

गाडीअड्ड्यातील अतिक्रमणे 15 दिवसांत हटवणार : ढवळे

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:49PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

व्हीनस कॉर्नर येथील गाडीअड्ड्यातील अतिक्रमण येत्या 15 दिवसांत हटवण्यात येणार आहे. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या वतीने ‘पे अँड पार्क’ योजना सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 250 घरांचे काम तीन महिन्यांत सुुरू करणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी पत्रकारांना दिली. तसेच महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा व मध्यवर्ती बसस्थानक येथे मल्टिलेव्हल पार्किंगचा प्रकल्प लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आशिष ढवळे यांनी शुक्रवारी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीची माहिती देताना ते म्हणाले, व्हीनस कॉर्नर येथील गाडीअड्ड्यावर अतिक्रमणाबाबत अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. त्यांनी पंधरा दिवसात या जागेवरील अतिक्रमण काढणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत चार टप्पे करण्यात आले आहेत. यापैकी शहरातील 8,000 नागरिकांनी या योजनेत अर्ज केले होते. अडीचशे अर्ज मंजूर झाले आहेत. या कामाला सुरुवात करण्याला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत  32 कोटी रुपयांची मागणी करणार आहे. यापैकी दर्शन मंडपासाठी 9 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. सरस्वती चित्रपटगृहासमोरील जागेतही व्यापारी संकुल प्रस्तावित आहे. मध्यवर्ती बसस्थानक येथील रिक्षा स्टॉपच्या जागेवर मल्टिलेव्हल कार पार्किंग करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक रिक्षा संघटनांशी चर्चा झाली आहे.

केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात कँटिन, तसेच कलाकार निवास सोय, मिनी थिएटर, रेकॉर्डिंग स्टुडिओ   आदींसाठी 9 कोटी 90 लाख रुपयांची मागणी करणार आहे. खेलो इंडिया खेलो योजनेंतर्गत 11 कोटी 40 लाख रुपयांची मागणी करण्यात येणार आहे. यावेळी विजय सूर्यवंशी, नाना कदम, किरण शिराळे, शेखर कुसाळे उपस्थित होते.