Tue, May 21, 2019 00:58होमपेज › Kolhapur › मजुरांच्या नोंदीसाठी आपले सरकार

मजुरांच्या नोंदीसाठी आपले सरकार

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 12:49AMबीड : दिनेश गुळवे

रोहयोमध्ये काम करणार्‍या मजुरांना सहा-सहा महिने मजुरी देता का,  म्हणण्याची वेळ मजुरावर येते, रोहयोचे मस्टर भरताना होणारा अर्थपूर्ण व्यवहार व यातूनच रोहयोचे निर्माण झालेले रोजगार हमी, अर्धे आम्ही अन् अर्धे तुम्ही हे चित्र बदलण्यासाठी आता मजुरांचे मस्टर भरण्यासाठी आपले सरकार या पोर्टलची मदत घेतली जाणार आहे. या योजनेत होणारा विलंब टाळला जाऊन भविष्यात अधिक सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

महाराष्ट्राने देशाला दिलेल्या रोजगार हमी योजनेत गेल्या काही दिवसांत बरेच पाणी मुरले आहे. दुष्काळ, उन्हाळा अशा परिस्थितीत मजुरांना काम मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये या उद्देशाने सुरू झालेल्या या योजनेत उखळ पांढरे करणारे दलाल शिरल्याने योजनेच्या उद्देशालाच खिळ बसण्याचे अनेकदा समोर आले आहे. यासह या योजनेत मस्टर भरण्यात महिना-महिना उशीर होत होता. याचा परिणाम बोगस मजूर दाखविणे, अधिकचे काम दाखविणे यासह मजुरी वेळेवर न मिळण्यावर होत होता. 

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेमध्ये आता मस्टर नोंदणीचे काम आपले सरकार या पोर्टलवरून केले जाणार आहे. सर्व ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र आहे. या केंद्रावर ग्रामपंचायतच्या पातळीवर आपले सरकार केंद्रावर ई-मस्टर निर्गमित करण्यात येणार आहेत. ही योजना या अगोदर नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये प्रायोगित तत्वावर राबविण्यात आली होती. तेथे योजना यशस्वी झाल्याने आता राज्यभरात ती लागू करण्यात आली आहे. 

रोजगार हमीवर मजुरांना हवे असलेले काम, कामांची मागणी, प्रत्यक्षात केलेले काम व त्याचे मोजमाप, मजूर संख्या, मजुरी आदींची नोंद या ई-मस्टरवर ग्रामरोजगार सेवक करणार आहेत. ही माहिती ते तालुका स्तरावरील ऑपरेटरला फोन करून देणार आहेत. यानंतर याची माहिती लगेच वरिष्ठांना कळविली जाणार आहे.