Fri, May 24, 2019 03:08होमपेज › Kolhapur › झाड कोसळल्याने खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यास तब्बल 24 तास!

झाड कोसळल्याने खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यास तब्बल 24 तास!

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 12:13AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

नैसर्गिक आपत्तीच्या मोठ्या तडाख्यातून बोध घेऊन जगभरात आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये विविध शहरांतील प्रशासने मोठी पावले टाकत आहेत. तथापि, कोल्हापुरात मात्र आपत्ती व्यवस्थापनाचा अद्याप श्रीगणेशाही झाला नाही, असा विदारक अनुभव येऊ लागला आहे. 

महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई बॉम्बस्फोटानंतर दोन दिवसांत पूर्ववत होऊ शकले. मात्र, एका किरकोळ वळिवाच्या तडाख्यात झाड उन्मळून पडल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसांची तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे पाहण्याचा कोल्हापूरकरांवर दुर्दैवी प्रसंग आला. या प्रसंगाने कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापनात आपण किती दूर आहोत, याची धोक्याची घंटा वाजविली आहे.

कोल्हापूर शहरात गेल्या आठवड्यात गुरुवारी सायंकाळी वळीव कोसळला. या वळिवामध्ये सोसाट्याच्या वार्‍याने झाडांच्या फांद्या तुटल्या. घरांचे पत्रे उडाले. वीज, टेलिफोनच्या तारा तुटल्या. तसेच साकोली कॉर्नरजवळ एक मोठे झाड विजेच्या खांबावर पडल्याने वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रसंग घडला, तेव्हा वीज मंडळाचे अधिकारी आणि अग्‍निशामक दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले खरे, पण त्यांच्याकडे आपत्ती निवारणासाठी आवश्यक त्या यंत्रसामग्रीचाच अभाव असल्याचे एक निरीक्षण कोल्हापूरकरांनी नोंदविले. कोल्हापूर महापालिकेच्या अग्‍निशामक दलाचे पथक वेळेत घटनास्थळी आले, पण त्यांच्याकडे झाडाच्या फांद्या तोडून विजेचा खांब मोकळा करण्यासाठी उंचीवरून काम करणारी क्रेन उपलब्ध नव्हती आणि लाकूड कापण्याचे जे यंत्र उपलब्ध होते, तेही सतत नादुरुस्त होत होते. यामुळे एका झाडाच्या फांद्या तोडून विजेचा खांब मोकळा करण्यासाठी या पथकाला रात्रीचे दोन वाजले. या दरम्यान, लाकूड तोडीचे यंत्र नादुरुस्त झाल्याने दुसरे यंत्र उपलब्ध करण्यासाठी जी धावाधाव झाली त्याची चर्चाही नको, अशी अवस्था आहे.

रात्री दोन वाजता खांब रिकामा झाला, पण वीज मंडळाकडे नवा खांब बसविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध नव्हती. हे आपत्ती व्यवस्थापनाच्या बोजवार्‍याचे दुसरे उदाहरण आहे. हा खांब उपलब्ध करण्यासाठी दुसर्‍या दिवशी सकाळचे 11 वाजले आणि त्यानंतर अथक प्रयत्नांनी सायंकाळी 7 वाजता विद्युतप्रवाह सुरू करण्यात विद्युत मंडळाला यश मिळाले. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरात एकाच वेळी आणखी काही झाडे उन्मळून पडली असती, तर काय स्थिती झाली असती, याची कल्पनाच केलेली बरी. तोकडे मनुष्यबळ, अपुर्‍या साधनसुविधा आणि नियोजनाचा अभाव यामध्ये सध्या कोल्हापूरचे आपत्ती व्यवस्थापन अडकले आहे. हे व्यवस्थापन प्रभावी व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आजवर शेकडो बैठका झालेल्या असतीलही. या बैठकांमध्ये कागदावर काही आराखडेही तयार करण्यात आले, पण हे आराखडे प्रत्यक्ष घटनास्थळी कसे परिणामकारकरितीने राबविले जाणार, हा खरा प्रश्‍न आहे. कारण अद्याप मान्सूनचे बरसणे तर दूरच राहो, ही साधी वळिवाची चाहूल आहे!
 

Tags : electricity, tree collapses, road, kolhapur news