होमपेज › Kolhapur › महावितरणमध्ये ‘युनिट’ वाढविण्याचा फंडा

महावितरणमध्ये ‘युनिट’ वाढविण्याचा फंडा

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:24PMकोल्हापूर : सुनील सकटे 

महावितरणने विजेचा सेल वाढविण्याच्या प्रयत्नात कर्मचार्‍यांसह ग्राहकांना नाहक त्रास देण्यात येत आहे. कमी वीज वापर असणार्‍या ग्राहकांना वाढीव वापराची वीज बिले देण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाच्या या कृतीमुळे कर्मचारी-प्रशासन यांच्यात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.  

महावितरणमध्ये कर्मचारी प्रशासन यांच्या विविध कारणांनी सुप्‍त संघर्ष सुरू आहे. सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने असहकार आंदोलन सुरू करून यास वाचा फोडली आहे. एसईएचे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असताना आता नवा वाद सुरू झाला आहे. गेल्या महिन्यापेक्षा जिल्ह्यातील विजेची विक्री आणि चालू महिन्यातील विक्री यामध्ये फरक पडल्याने प्रशासनाने गेल्या महिन्याइतकी विक्री झालीच पाहिजे, असा तगादा लावला आहे. यासाठी कमी वीज वापर असणारे आणि फॉल्टी मीटरचे ग्राहक टार्गेट केले आहेत. अनेकांच्या घरी मर्यादित विद्युत उपकरणे असल्याने अशा ग्राहकांचा वीज वापर कमीच असतो. एवढेच नाही तर बंद घरातील वीज वापरही मर्यादित पेक्षा काहीच नसतो. त्याचा आधार घेऊन अशा ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठविण्याची कर्मचार्‍यांवर सक्‍ती केली जात आहे. यासाठी कर्मचार्‍यांना वेठीस धरण्यात येत आहे. 50 ते 60 युनिट वीज वापर असणार्‍या ग्राहकांना तब्बल 80 ते 90 युनिटचे बिल पाठविण्यात येत आहे.  यासाठी कर्मचार्‍यांना तोंडी सूचना दिल्या जात आहेत. अ‍ॅवरेज बिल वाढविण्यामुळे पोकळ थकबाकीचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. अशी चुकीची बिले पाठविण्यात आल्याने (बी 80) बील दुरुस्तीसाठीच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. 

एकीकडे सरकारने एलईडी बल्ब, ट्यूब आणि फॅन वितरीत करून वीज वापरात बचत करण्याचे धोरण अवलंबिले असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाने कमी वीज वापर दिसतो म्हणून थेट युनिट वाढविण्याचा फंडा सुरू केला आहे. प्रशासनाच्या या कृतीने ग्राहक आणि जनमित्र यांच्यात संघर्ष उडविण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचारी संघटनेने थेट आक्षेप घेऊन प्रशासनास लेखी पत्र दिले आहे. या पत्रात कंपनी थेट युनिट वाढवित असल्याचा आरोप केला आहे. तसेच यापूर्वी शेतीपंपांच्या बिलात असा प्रकार झाल्याचा गौप्यस्फोट संघटनेने केला आहे. एकूणच महावितरण कंपनीने महसूल मिळवून देणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांवर असा चुकीच्या पद्धतीने अन्याय सुरू केला आहे. घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक अशा सर्वच वर्गवारीतील कमी वीज वापर करणार्‍या ग्राहकांना याचा भुर्दंड बसत आहे. 

फॉल्टी मीटरची जबाबदारी कंपनीची 
महावितरणने वीज विक्री वाढवून दाखविण्यासाठी केलेला प्रकार ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. फॉल्टी मीटरधारकांना याचा मोठा फटका बसत आहे. वास्तविक पाहता फॉल्टी मिटर बदलून देण्याची कंपनीची जबाबदारी आहे. एक तर जबाबदारी पार पाडत नाही. उलट या संधीचा फायदा घेऊन कमी वीज वापरणार्‍या ग्राहकांना जादा बिले पाठविण्याचा प्रकार ग्राहकांत संताप निर्माण करणारा ठरत आहे.