Fri, Nov 24, 2017 20:20होमपेज › Kolhapur › तरुणांनो, मनस्थिती बदला,...परिस्थिती बदलेल

तरुणांनो, मनस्थिती बदला,...परिस्थिती बदलेल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर :  प्रतिनिधी

तरुणांनो, विचार सच्चे ठेवा. प्रचंड मेहनत करा. आयुष्यात यश-अपयश येणारच. निराश व्हायचं नाही. मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल असा मौलिक सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिला. शेती आतबट्ट्यात आहे. गाई, म्हैशी पालन असा जोडधंदा केला तरीही शेती परवडत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता धोरण बदलावे लागेल. यासाठी शेतकर्‍यांच्या खळ्याला पूर्वीसारखा सोन्याचा भाव मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

मराठा विद्यार्थी सेना वर्धापनदिनानिमित्त गुणगौरव व पुरस्कार वितरण तसेच प्रा. मधुकर पाटील लिखित ‘एक मराठा, लाख मराठा वर्तमान व भविष्य’ या पुस्तकाचे प्रकाशन या संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. निकम बोलत होते. शाहू स्मारक मिनी सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे, खासदार धनंजय महाडिक, उपमहापौर अर्जुन माने उपस्थित होते.

अ‍ॅड. निकम म्हणाले, तरुणांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम द्यावा, शेतकर्‍यांच्या मुलांकडे गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही. संकटांवर तरुणांनी मात केली पाहिजे. मराठा समाजाने शांततेत आणि शिस्तबध्द मोर्चा काढून संपूर्ण जगासमोर एक मूर्तीमंत उदाहरण घालून दिले आहे. 

चळवळीत होतो बरं होतं, आता लई अडचण हाय : राज्यमंत्री खोत 
चळवळीत अघळ पघळ बोलता येतं. झालंच पाहिजे म्हणता येतं. सरकारी तिजोरीत पैसे आहेत का नाहीत याचा विचार करायची गरज नसते. उघड्या माळावर बोलायला पाटलाची परवानगी लागत नाही; पण आता लई अडचण होते. कारण लोक म्हणत्यात पहिलं कसं रेटून बोलत होता. त्यामुळे आता सगळं बरोबर आहे म्हणावं लागतं. कारण आता पर्यायच नसतो असं राज्यमंत्री खोत म्हणाले. 

डॉ. मोरे म्हणाले, तरुणांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तरुणांनी सतत नवनवीन शिकले पाहिजे. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील प्रास्ताविक करताना  म्हणाले, मराठा तरुणांनी संघटीत होऊन समाजाचे प्रश्‍न सोडवले पाहिजेत. यावेळी कृष्णराज महाडिक, सरोज कोळी, आनंदा गायकवाड, ईश्‍वरी वर्धाळी, नेहारिका साळुंखे, अनुज्ञा खराटे, प्रा.डॉ. ज्योती जाधव, नामदेव रेपे, सलीम जमादार आदींना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी गोकुळचे संचालक अरुण नरके, अरुण डोंगळे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, आनंद माने, माणिक पाटील-चुयेकर, भरत पाटील, सुरेश कुराडे, किसन कुराडे, विजय भोसले आदींसह  मान्यवर उपस्थित होते.