Sat, Mar 23, 2019 12:05होमपेज › Kolhapur › रमजान ईद उत्साहात 

रमजान ईद उत्साहात 

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुस्लिम बांधवांचा रमजान ईद (ईद उल फित्र) हा सण शनिवारी (दि. 16) कोल्हापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात सर्वधर्मीयांनी मिळून साजरा केला. सकाळी नमाज पठण झाले. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. कोल्हापूरसह इचलकरंजी, आजरा, गडहिंग्लज, कागल आदीसह जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

 मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर नमाज पठण करण्यात आले. या ठिकाणी पहिल्या जमातीकरिता मुफ्ती इरशाद कुन्‍नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसर्‍या जमातीच्या नमाजाकरिता हाफीज आकिब म्हालदार व तिसर्‍या जमातीकरिता मौलाना राहमतुल्‍ला कोकणे यांनी नमाज पठण केले. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, भाजपचे जिल्हाध्यक्ष (महानगर) संदीप देसाई आदी उपस्थित होते. या ठिकाणी सर्वांनी मिळून कोल्हापूरची व देशाची एकात्मता तसेच सुख, शांती अबाधित राहावी म्हणून प्रार्थना केली. यानंतर मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने शिरखुरम्याचे वाटप करण्यात आले. स्वागत कादरभाई मलबारी यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आदिल फरास, सुप्रिटेंडेंट साजित खान, संचालक पापाभाई बागवान, लियाकत मुजावर आदी उपस्थित होते. आभार चेअरमन गणी आजरेकर यांनी मानले.