होमपेज › Kolhapur › प्राध्यापक पदभरती बंदी येत्या काळात उठेल : तावडे

तावडेसाहेब 'तो' काळ नेमका कधी येणार?(Video)

Published On: May 13 2018 4:26PM | Last Updated: May 13 2018 4:18PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

राज्यभरात सहाय्‍यक प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठविण्याच्या मागणीसाठी सेट, नेट, पीएचडीधारकांची आंदोलने सुरू आहेत. १५ मे रोजी या आंदोलनाचे लोण मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. परंतु, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, प्राचार्य पदावरील भरतीबंदी उठवली असून येत्या काळात सहाय्‍यक प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठेल, असे सांगितले. कोल्‍हापुरातील शिवाजी विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते. 

यावेळी सहाय्‍यक प्राध्यापक पदभरती बंदी संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना, "प्राचार्य पदभरतीवरील बंदी उठवली आहे. येत्या काळात प्राध्यापक पदांवरील बंदी उठेल. त्याबाबत वित्त विभागाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल," असे तावडे म्‍हणाले. परंतु, आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ठोस निर्णयाबाबत अधिक बोलणे त्यांनी टाळले. 

राज्यभरातील पात्रताधारक 'चलो आझाद मैदान, मुंबई'ची हाक देत आहेत. प्राध्यापक पदभरतीवरील बंदी त्‍वरीत रद्द करावी, अन्यथा आत्‍महत्या करण्याची रितसर परवानगी द्यावी, अशा मागणीसाठी पात्रताधारक मुंबईत आंदोलन करणार आहेत. तसेच आम्‍ही डॉक्‍टरेट सीएचबी करण्यासाठीच नाहीतर पूर्णवेळ कार्यरत होण्यासाठी घेतली आहे, असे आंदोलकांचे म्‍हणणे आहे. 

याबाबत कोल्‍हापुरातून पात्रताधारकांनी राज्यपालांना शेकडो पत्रे पाठविली. अनेकदा निवेदनेही दिली आहेत. परंतु, यावर कोणतेही ठोस आश्वासन संबंधितांकडून अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यभरातील सेट, नेट, पीएचडीधारकांनी राज्य शासनाच्या उच्‍च शिक्षणातील धोरणाबद्दल लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवार (दि.१५) रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील पात्रताधारक जमणार आहेत.

सरकारने पात्रताधारकांची घोर निराशा केली

राज्यसरकारने सेट, नेट, पीएचडी धारकांची घोर निराशा केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी कित्येक दिवस झाले आंदोलने सुरू असूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आताही तावडे यांनी येत्या काळात प्राध्यापक पदभरतीवरील बंदी उठेल, असे म्‍हटले आहे. परंतु, तावडेसाहेब तो काळ नेमका कधी येणार? आता १५ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर येऊनच आपला निर्णय सांगा, असे पात्रताधारक डॉ. किशोर खिलारे म्‍हणाले. 

Tags : kolhapur, vinod tawade, education minister, assistant professor,