Thu, Jan 24, 2019 08:16होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजचा पूर्व भाग विकासात पिछाडीवर!

गडहिंग्लजचा पूर्व भाग विकासात पिछाडीवर!

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 15 2018 11:52PMबसर्गे : सुभाष थोरात

गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात पाणी, आरोग्य, रस्ते, बेरोजगारी या सर्वच पातळ्यांवर येथील ग्रामस्थांची आबाळच झाली असून, आमच्याकडे विकासाची पहाट उजाडणार तर कधी, असा आर्त सवाल या भागातील जनता विचारत आहे.  

पाचवीला पूजलेला पाणीप्रश्‍न
पाणीटंचाई हा तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेच्या पाचवीला पूजलेला प्रश्‍न आहे. पावसाचे प्रमाण खूपच अत्यल्प असल्याने शेती आणि पिण्याचे पाण्याच्या टंचाईला नेहमीच तोंड द्यावे लागते. तेरणी, नरेवाडी, येणेचवंडी हे लघू पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने कधीच भरलेले नाहीत. परिणामी, या प्रकल्पांवर असलेल्या पाणी योजना उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच बंद पडतात. बुगडीकट्टी, चंदनकुड, हलकर्णी, मनवाड, नरेवाडी, येणेचवंडी, तुपूरवाडी, हिडदुगी या गावांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जानेवारी-फेबु्रवारीनंतर हिरण्यकेशी पूर्व भागात कोरडी पडते आणि खणदाळ, नांगनूर, कडलगे, आरळगुंडी या काठावरील गावांनाही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.

आरोग्य सेवाच ‘सलाईन’वर
 हलकर्णी येथील प्राथमिक केंद्राची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच अवस्था आहे.  तेरणी माळावर आरोग्य केंद्र उभारण्यात आले. मात्र, याकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णालयाकडे जाणे नको वाटते. रुग्णालयातील अपुरा कर्मचारी वर्ग, सुविधांच्या वानवांवर केवळ चर्चाच होते.

बेरोजगारी वाढता वाढता वाढे!
 पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने एखाद्या औद्योगिक प्रकल्प अथवा उद्योगांची निर्मिती झाली नाही. परिणामी येथील युवकांना संकेश्‍वर, गडहिंग्लज, बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी रोजगारासाठी जावे लागते. या भागात  उद्योग उभारल्यास बेरोजगारीची प्रश्‍न काहीअंशी सोडविण्यास मदत होईल.