Fri, Jul 19, 2019 05:15होमपेज › Kolhapur › ‘ई-नाम’ प्रणालीकडे सर्वांचीच पाठ

‘ई-नाम’ प्रणालीकडे सर्वांचीच पाठ

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:24AMकोल्हापूर : संग्राम घुणके

शभरात शेतमालाची एकच राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण व्हावी. या बाजारपेठेशी देशातील सर्व बाजार समित्या जोडल्या जाव्यात, शेतमाला विक्रीनंतर काही क्षणातच शेतकर्‍याला पैसे मिळावेत, यासाठी केंद्र शासनाने ‘ई- नाम’ ही प्रणाली अस्तित्वात आणली. मात्र, या प्रणालीकडे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शेतकरी, अडत दुकानदार, व्यापारी या सर्वच घटकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी ऑनलाईन व्यवहारांची गती खुंटली आहे.

ई-नामद्वारे शेतकर्‍यांच्या  शेतमाल ऑनलाईन प्रणालीने विक्री होतो. यासाठी शेतकरी, अडत दुकानदार, व्यापारी या घटकांचे बँक खाते, आधार व मोबाईल क्रमांक घेतले जातात. शेतमाल समितीत आणल्यानंतर गेटवर त्याची नोंदणी होते. त्यावेळी शेतकर्‍याचा बँक अकाऊंट, आधार व मोबाईल क्रमांक घेतला जातो. शेतमालाची ई-अ‍ॅक्शनद्वारे विक्री होते. कॅमेर्‍यासमोर विक्री व्यवहार होत असल्यामुळे त्याचे रेकॉर्डिंगही राहते. शेतमालाचे गुणवत्ता तपासणीनंतर टॅबद्वारे फोटो पाठविले जातात. तसेच समित्यांमध्ये या शेतमालाच्या गुणवत्ता तपासणीबाबाबत असेईंग लॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील कोणत्याही ठिकाणाहून व्यापार्‍याला माल खरेदी करण्याची सुविधा या योजनेत आहे. शेतमाल विक्री झाल्यानंतर खरेदीदाराच्या बँक अकाऊंटमधून तत्काळ पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होतात. 

राज्यात पहिल्या टप्प्यातील 30 बाजार समित्यांमध्ये कोल्हापूर बाजार समितीचा समावेश होता. 15 ऑगस्ट 2017 रोजी कोल्हापुरात ई-अ‍ॅक्शनद्वारे ऑनलाईन व्यवहारांना प्रारंभ झाला. यासाठी वेब कॅमेरे, संगणक, प्रोजेक्शन टी.व्ही. यासह 30 लाखांचे साहित्य व लिज लाईन बसविण्यात आली. मात्र, या योजनेच्या बाबतीत शेतकरी, अडत दुकानदार, व्यापारी यांनी या योजनेत नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे येथे पारदर्शी व्यवहार होणार कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी कोल्हापूर बाजार समितीने  आतापर्यंत केवळ 37 ग्रामसभा घेतल्या आहेत. त्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.

तांत्रिक अडचणी व उपाययोजना 
 गुळाची चवीवरून किंमत ठरते. ऑनलाईन व्यवहारात त्याची चव, रवाळपणा कळत नाही. तसेच काही शेतकर्‍यांनी अडत दुकानदार, व्यापारी यांच्याकडून अगोदर उचल केलेली असते. भाजीपाल्याच्या बाबतीत एका टेम्पोत चार-पाच शेतकर्‍यांचा शेतमाल असतो. अनेकदा शेतकरी स्वतः न येता ड्रायव्हलाच अडत दुकानदाराकडे शेतमाल विक्रीसाठी लावण्यास सांगतात. या तांत्रिक अडचणींचे निराकरण होणे, शेतकर्‍यापर्यंत जागृती होण्यासाठी रेडिओ व इतर माध्यमांचा वापर करणे गरजेचे असल्याचे याबाबत जाणकारांचे मत आहे.

शेतकर्‍यांत गैरसमज
शेतकरी घटकासाठी ही योजना अस्तित्वात आली. शेतमालाला अडचणीच्या काळात अनुदान काही मदत द्यावयाची झाल्यास या व्यवहारांची मदत होते. गतवर्षी कांदा उत्पादकांना बाजार समित्यांमधील व्यवहारावरून अनुदान प्राप्त झाले. मात्र, केवळ बँक खाते क्रमांक द्यावयाचा नाही, या गैरसमजातून शेतकर्‍यांनी यामध्ये नोंदणी केलेली नाही. शेतकर्‍यांतच निरुत्साह राहिला आहे.