Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Kolhapur › डीएसके प्रकरण : कोल्हापुरात ठेवीदारांना टेन्शन

डीएसके प्रकरण : कोल्हापुरात ठेवीदारांना टेन्शन

Published On: Feb 17 2018 5:09PM | Last Updated: Feb 17 2018 6:10PMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘डीएसके’ग्रुपचे सर्वेसर्वा डीएसके तथा दिपक कुलकर्णी आणि पत्नी हेमंती यांना गुन्हे अन्वेषण विभागाने दिल्लीत अटक केल्याची बातमी शनिवारी पहाटे कोल्हापुरात धडकताच शहर, जिल्ह्यातील गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोकाच चुकला. पैसे परत मिळतील या आशेवर दिवस काढणार्‍या ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

शहर, जिल्ह्यातील साडेसहाशेवर ठेवीदारांनी 250 कोटींपेक्षा अधिक रक्कम ‘डीएसके’मध्ये गुंतवल्याचा ठेवीदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार, अ‍ॅड. सत्यजित पवार यांनी दावा केला होता. प्रत्यक्षात 275 गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.

दाखल तक्रारीनुसार 17 ते 18 कोटींची रक्कम कंपनीकडे अडकल्याचे निष्पन्न होत आहे, असे गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे यांनी सांगितले. डीएसके ग्रुपविरुध्द अजूनही तक्रारी दाखल होवू शकतात. याबाबत गुंतवणूकदारांनी गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर, या पत्त्यावर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे. 

डिएसके, पत्नी, मुलावर नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल

गुंतवणूकदारांना पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, पत्नी हेमांगी व मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या विरुध्द पुणे, मुंबईसह कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात दि. 9 नोव्हेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

275 सलग्न पुरवणी फिर्याद
बाजीराव दादोबा किल्लेदार (68, कळंबा) यांच्या फिर्यादीला 275 गुंतवणूकदारांच्या पुरवणी फिर्यादी सलग्न करण्यात आल्या आहेत. डिएसकेसह संशयितांनी 18 लाख 64 हजार 568 रूपयाची फसवणूक केल्याचे किल्लेदार यांनी म्हटले आहे.

गुंतवणूकदार कमालीचे हादरले!
‘डीएसके’ग्रुपमधील गुंतवणूक केलेली रक्कम आज ना उद्या मिळेल, या आशेवर गुंतवणूकदार होते. तथापि डीएसकेसह त्यांच्या पत्नीला नवी दिल्ली येथील हॉटेलातून अटक झाल्याची बातमी भल्या पहाटे येथे धडकताच गुंतवणूकदार कमालीचे हवालदिल झाले.

भल्या पहाटे पोलिस ठाण्याकडे धाव
शहर, जिल्ह्यातून एक लाखापासून कोटीपर्यंतच्या रक्कमा ठेवीदारांनी कंपनीकडे गुंतविल्या आहेत. या सार्‍यांच्या आशेवर तुर्त पाणी पडल्याचे दिसून येत आहे. तक्रारी दाखल केलेल्या काही गुंतवणूकदारांनी सकाळी पोलिस ठाण्यात धाव घेत झालेल्या कारवाईची खात्री केली.

अटकेसाठी कोर्टात धाव घेणार
तपासाधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे म्हणाले, डीएसकेच्या कोल्हापूर(टोप) व सांगली जिल्ह्यातील मालगांव येथील मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. दोनही जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी ट्रान्स्फर वॉरंटसाठी कोर्टात अर्ज करण्यात येत आहे.