Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Kolhapur › औषध खरेदी घोटाळ्यावरून ‘झेडपी’ दणाणली

औषध खरेदी घोटाळ्यावरून ‘झेडपी’ दणाणली

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 09 2018 11:20PMकोल्हापूर : प्रतिनिधी

औषध खरेदी घोटाळ्यावरून सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गोंधळ घालत सभागृह दणाणून सोडले. बदनामी होत असल्याने काय तो सोक्षमोक्ष लावण्यासाठी स्वतंत्र सर्वपक्षीय समितीची मागणी करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावर सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी, प्रशासकीय चौकशी सुरू असून, कुणालाही पाठीशी घालणार नाही. हवे असल्यास दुसर्‍या समितीकडून चौकशीस तयार आहे, असा आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर वातावरण थोडे निवळले; पण त्यानंतरही आरोग्य विभागांच्या सेवांवरून सदस्यांनी प्रशासनाची झाडाझडती घेत कारवाईची मागणी लावून धरली. 

शुक्रवारी शाहू सभागृहात दुपारी सर्वसाधारण सभा झाली. गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या 16 लाखांच्या औषध खरेदी घोटाळ्यावरून अपेक्षेप्रमाणे सभागृहात सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. राजवर्धन निंबाळकर यांनी विषयाला तोंड फोडत या घोटाळ्यास सीईओदेखील जबाबदार असून, त्यांनीही चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जावे, अशी मागणी केली. विजय भोजे यांनी सर्वपक्षीय समिती नेमण्याची सूचना केली. अरुण इंगवले यांनी आतापर्यंत झालेली चौकशी चुकीची होती का, असा सवाल उपस्थित  केला. 

भगवान पाटील यांनी 2007 च्या औषध घोटाळ्याला उजाळा देताना तातडीने समिती स्थापून कारवाई केल्याचे सांगितले. मनोज फराकटे यांनी डिसेंबरपासून घटना घडत असताना दुर्लक्ष का केले, असा सवाल केला. सतीश पाटील यांनी घोटाळा कसा झाला, हे सभागृहाला सांगा, अशी विनंती केली. यावर सीईओ डॉ.  खेमनार यांनी 22 डिसेंबर 2017 पासून 3 मार्चला दोन अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे सांगत समितीचा अहवाल वित्तीय व तांत्रिक छाननी करून आवश्यक बदल करूनच स्वीकारला आहे. त्याप्रमाणे कारवाईही सुरू असून, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कारवाईचे अधिकार शासनाला असल्याने शासनाकडे 12 मार्चनंतर कारवाईसाठीचा अहवाल पाठवणार असल्याचे स्पष्ट केले. 

औषध घोटाळ्यावर दीड तासाहून अधिक काळ चर्चा झाल्यानंतरही  समिती नेमण्याबाबत एकमत झाले नाही.  सदस्यांनी आरोग्य केंद्रातील कारभारावरून प्रशासनाला खडे बोल सुनावले. पोलिओ लसीकरणासाठी दिलेले मार्कर खराब असल्याचे वंदना जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. यावर ठेकेदाराची बिले थांबवल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार यांनी सांगितले. पांडुरंग भांदिगरे यांनी आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरण्याची मागणी केली. 

 वर्तवणुकीवरून अधिकारी धारेवर
घोटाळ्यावरील चर्चेत अधिकार्‍यांच्या वर्तवणुकीवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अधिकारी सदस्यांना जुमानत नाहीत. सोमवारी व शुक्रवारी मुख्यालयात हजर राहत नाहीत, अशा तक्रारी मांडल्या. शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले हे कार्यालय सोडून दुसरीकडेच बसतात, हे सदस्य सुभाष सातपुते यांनी उघड केले. पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंते एस. एस. शिंदे सर्वसाधारण सभेलाच गैरहजर राहत असल्याचे राजवर्धन निंबाळकरांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव हे कार्यालयात कायम मोबाईलवरच असतात. त्यामुळे त्यांना गेम भेट देऊ, असेही निंबाळकरांनी सुनावले. अधिकार्‍यांची मनमानी खपवून घेणार नसल्याचे सांगत विजय भोजे यांनी पालकमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार करण्याचा इशारा दिला.  सतीश पाटील व प्रदीप झांबरे यांनीही अधिकारी, कर्मचारी ठरलेल्या दिवशी कार्यालयात हजर नसतात, अशी तक्रार केली. याला उत्तर देताना सीईओ डॉ. खेमनार यांनी सोमवारी व शुक्रवारी मुख्यालयात राहतील असे परिपत्रक काढू. शिवाय, अधिकार्‍यांना रजा अध्यक्षांच्या परवानगीनेच दिली जाईल. दुपारी दीड ते दोन ही जेवणाची वेळ ठरवून देऊ, असे परिपत्रक काढू, असे सांगितले. 

आरोग्य केंद्राची जागाच परस्पर खासगीच्या नावावर
नवे पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील 3 गुंठे जागा परस्परच खासगी व्यक्तीच्या नावावर चढवली गेल्याचा प्रकार करवीरचे सभापती प्रदीप झांबरे यांनी सभागृहात उघड केला. सीईओ, बांधकाम कार्यकारी अभियंते, मालमत्ता विकास अधिकारी यांना याबाबत जाब विचारला; पण त्यांनाही याबाबतीत काहीच माहिती नसल्याचे समोर आल्याने सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करा आणि जागा नावावर करून घ्या, अशी सूचना झांबरे यांनी केली. शाहूवाडी सभापती डॉ. स्नेहा जाधव यांनी  मलकापूर येथील स्थलांतरित आरोग्य केंद्रात अशाच प्रकारे अतिक्रमण करून जागा हडपण्याचा डाव असल्याचे सभागृहात सांगितले.