होमपेज › Kolhapur › एका दिवसात ड्रायव्हिंग लायसन हातात

एका दिवसात ड्रायव्हिंग लायसन हातात

Published On: Jun 29 2018 12:29PM | Last Updated: Jun 29 2018 12:25PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सेवा हमी कायद्यातील तरतुदीपेक्षा कमी कालावधीत म्हणजेच एका दिवसात ड्रायव्हिंग लायसन देण्यास गुरुवारी प्रारंभ केला. एवढेच नाही तर कोल्हापूर कार्यालयात चाचणी झालेल्या वाहनधारकांना थेट हातात लायसन देण्यात येत असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शिंदे म्हणाले, सेवा हमी कायद्यानुसार पंधरा दिवसांत ही प्रक्रिया करण्याचे बंधन आहे. तसेच कायद्यानुसार ड्रायव्हिंग लायसन  नागरिकांना थेट हातात न देता पोस्टाने देण्याचे बंधन आहे. यावर तोडगा म्हणून प्रायोगिक तत्त्वावर एका दिवसात ड्रायव्हिंग लायसन आणि आरसी बुक देण्याचे नियोजन केले. ड्रायव्हिंग लायसन देण्याची सुरुवात गुरुवारी करण्यात आली. वाहन चालविण्याची चाचणी कोल्हापूर कार्यालयात दिलेल्या वाहनधारकांना त्याच दिवसी थेट हातात ड्रायव्हिंग लायसन देण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाने विशेष परवानगी दिली आहे. त्यासाठी मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक नोंदणी केली जाणार आहे. नूतनीकरण, नवीन असे रोज 300 ड्रायव्हिंग लायसन प्रकरणे येतात, यांना लाभ मिळणार आहे. 

शिंदे म्हणाले, नोंदणीनंतर त्याच दिवसी वाहनाचा क्रमांक मोबाईल  एसएमएसद्वारे दिला जाणार आहे.  रोज सुमारे 250 ते 300 वाहनांची नोंदणी होत असून त्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  वाहनधारकांना कोल्हापुरात येऊन कामे करणे कठीण होत असल्याने कॅम्प (शिबिर) घेण्यात येतात. या कॅम्पची संख्या वाढविण्यात आली आहे. महिना 22 ऐवजी आता चाळीस कॅम्प घेतले जाणार आहेत. इचलकरंजी सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी, जयसिंगपुरात दर बुधवारी, मलकापूर प्रत्येक महिन्यातील पहिल्या आणि तिसर्‍या सोमवारी, वारणानगर प्रत्येक महिन्यातील पहिल्या आणि तिसर्‍या मंगळवारी, मुरगूड प्रत्येक महिन्यातील दुसर्‍या आणि चौथ्या मंगळवारी, गारगोटी प्रत्येक बुधवारी, वडगाव प्रत्येक महिन्यातील पहिल्या आणि तिसर्‍या गुरुवारी, राधानगरी  प्रत्येक महिन्यातील दुसर्‍या आणि चौथ्या  गुरुवारी, गडहिंग्लज प्रत्येक शुक्रवारी, चंदगड  प्रत्येक महिन्यातील पहिल्या आणि चौथ्या शनिवारी कॅम्प घेण्यात येणार आहे. स्कूल बस मालक आणि चालकांनी स्कूलबसची पुनर्तपासणी करून घ्यावी. पालकांनी अशा बस सुरक्षित आहेत का, याची खातरजमा करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारीस यांनी केले. यावेळी  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे, वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक पी. डी. ए. के. पाटील उपस्थित होते.