होमपेज › Kolhapur › मद्यपी तरुणांचा हॉटेलमध्ये धुडगूस : चाकूचा धाक

मद्यपी तरुणांचा हॉटेलमध्ये धुडगूस : चाकूचा धाक

Published On: Mar 01 2018 1:38AM | Last Updated: Mar 01 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी

व्हीनस कॉर्नर येथील हॉटेलमध्ये मद्यपी तरुणांनी धुडगूस घालत साहित्याची मोडतोड केली. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. अडवणूक करणार्‍या हॉटेलच्या तीन कर्मचार्‍यांना चाकूचा धाक दाखवत या तरुणांकडून मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

व्हीनस कॉर्नर परिसरातील इंद्रप्रस्थ हॉटेलमध्ये काही तरुण जेवणासाठी आले होते. यातील काहींनी अतिप्रमाणात  मद्यसेवन केल्याने जेवणाच्या कारणावरून त्यांचा वेटरशी वाद झाला. हॉटेलमध्ये हे तरुण आरडाओरडा करून कर्मचार्‍यांना दमदाटी करू लागले. वारंवार सांगूनही हे तरुण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. एकाने खुर्ची उचलून काचेवर फेकल्याने काचेचे नुकसान झाले. तसेच अडवणूक करणारे हॉटेलचे कर्मचारी विजय बळवंत खोत (वय 25, रा. खोतवाडी, शाहूवाडी), सिद्धार्थ कांबळे (पेंडागळे, शाहूवाडी), सुनील घेवारे (25, पन्हाळा) यांना मारहाण करण्यात आली.

हॉटेलमध्ये धुडगूस घालून शिवीगाळ करत हे तरुण निघून गेले. याबाबत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.