Wed, Apr 24, 2019 11:28होमपेज › Kolhapur › सांडपाणी थेट पंचगंगेत सोडू नका : राजू शेट्टी 

सांडपाणी थेट पंचगंगेत सोडू नका : राजू शेट्टी 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पंचगंगा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे बंद करा, अशी सूचना खासदार राजू शेट्टी यांनी महापालिका प्रशासनाला केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हा विकास समन्वय समितीची शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते दुरुस्तीसाठी मर्जीप्रमाणे निधी खर्च करता का, असा सवाल करत त्याबाबतचा प्राधान्य क्रमानुसार आराखडा तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कावीळ, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पंचगंगा काठावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. नागरिकांच्या आरोग्यांच्याद‍ृष्टीने कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे बंद केले पाहिजे, असे सांगत त्यांनी दुधाळी व जयंती नाला येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची माहिती घेतली. सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पांना अचानक भेट देऊ, असेही त्यांनी सांगितले. ‘प्रधानमंत्री ग्राम सडक’मधील रस्ते दुरुस्तीसाठी अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, मर्जीने रस्त्यांची कामे केली जात आहे, त्याचा काही प्राधान्य क्रम, गरज काही पहिली आहे का, अशी विचारणा करत याबाबतचा आराखडा तयार करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

अवैध उत्खननाबाबत काय केले, असा सवाल त्यांनी केला. त्यावर शाहूवाडी तालुक्यात आढळून आलेल्या अवैध उत्खननाचे काम थांबवले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. खनिकर्म निधी वापराबाबतही आराखडा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्या बँका झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास नकार देत आहेत, त्यांना सूचना देऊनही त्या प्रतिसाद देत नसल्यास त्यांची तक्रार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कागल नगरपालिकेमध्ये पंतप्रधान आवास योजना (शहरी) यामध्ये झालेल्या कामांचे ऑडिट करून एक महिन्यात अहवाल सादर करावा. या योजनेतील उर्वरित 400 घरे पूर्ण करण्याचे काम येत्या 3 ते 4 वर्षांत करण्याचे नियोजन करावे अशीही सूचना त्यांनी केली.

सभेचे सहअध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी कुत्रे चावून रेबीज होण्याच्या घटना वाढत आहेत. भटक्या कुत्र्यांना आवार घालण्याबाबत महानगरपालिका कोणत्या उपाययोजना करीत आहेत याबाबत विचारणा केली. सीपीआरकडे रेबीज प्रतिबंधक लसींचा किती साठा उपलब्ध आहे याची माहिती घेतली. यावर जिल्ह्यात 3 हजार 742 रेबीज प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. विलास देशमुख यांनी दिली. टाकाळावरील स्वीमिंग पुलाची गळती अद्यापही निघालेली नाही. ती काढण्याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी असे सांगून रंकाळा तलावाशेजारील अंबाई स्वीमिंग टँक नूतनीकरणाचे कामाबाबत चर्चा केली. संसद आदर्श ग्राममधील विविध विकासकामांसाठी शासनाकडून आवश्यक निधी प्राधान्याने उपलब्ध होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत मिशन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पायाभूत सुविधा कार्यक्रम, महानगरपालिका व नगरपालिकांकडील विविध योजना यांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महानगरपालिकेचे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा हरिष जगताप आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोरांच्या तोंडचा घास खाताना शरम का वाटत नाही?
या बैठकीत शालेय पोषण आहाराचे गेल्या एप्रिलपासून पैसेच आले नसल्याचे समोर आले. हा प्रकार धक्‍कादायक आहे. 24 कोटींची आवश्यकता असताना 9 कोटींचा निधी आला. मात्र, तो ही गेल्या वर्षीसाठी होता. बहुतांशी महिला बचत गटांंकडेच याचा ठेका आहे, त्यांना हे काम करताना अडचणी येत आहेत, पोरांच्या तोंडचा घास खाताना सरकारला शरम का वाटत नाही, असा सवाल करत याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा. शेट्टी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.