Tue, Mar 19, 2019 20:29होमपेज › Kolhapur › डॉ. योगेश जाधव यांचा नागरी सत्कार यशस्वी करण्याचा निर्धार

डॉ. योगेश जाधव यांचा नागरी सत्कार यशस्वी करण्याचा निर्धार

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष व  दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचा सर्वपक्षीयांच्या वतीने  शनिवारी (दि.14 जुलै) केला जाणारा नागरी सत्कार यशस्वी करण्याचा निर्धार रविवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीस राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व औद्योगिक आदी सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. योगेश जाधव सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या निमंत्रक, महापौर सौ. शोभा बोंद्रे होत्या.  यावेळी कार्यक्रमासाठी विविध उपसमित्यांची स्थापना करण्यात आली. 

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांचा शनिवारी (दि.14 जुलै) सर्वपक्षीयांच्या वतीने भव्य सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रविवारी बैठक झाली.

माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, ‘पुढारी’ हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. त्यामुळे डॉ. योगेश जाधव यांना मिळालेले कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जाचे पद हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी असणार, अशी आपली भावना आहे. डॉ. योगेश जाधव यांचा नागरी सत्कार हा लोकोत्सवासारखा होणार असल्याने यासाठी काटेकोर नियोजन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच प्रत्येकाला कामाची जबाबदारी दिली जाईल. डॉ. योगेश जाधव सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीची रचना  व्यापक करण्यात आली आहे. कामाच्या विभागणीनुसार या समितीच्या उपसमितींची स्थापना करण्यात यावी, अशी सूचना यावेळी त्यांनी केली.

लोकांचे आणि ‘पुढारी’चे वेगळे नाते 

ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, लोकांचे आणि ‘पुढारी’चे वेगळे नाते आहे. दैनिक ‘पुढारी’ने कधी ना कधी प्रत्येकाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली आहे. त्यामुळे हा सत्कार कार्यक्रम कोल्हापूरकरांच्या भावनिक नात्याचा विषय आहे. सत्काराच्या नियोजनात सर्व संस्था व संघटनांचा सहभाग आहे. 

शिस्तबद्ध नियोजन करूया

हॉटेल मालक-चालक संघाचे आनंद माने म्हणाले, नागरी सत्कार कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. कार्यक्रमास लोक मोठ्या प्रमाणावर येणार असले तरी प्रत्येक ठिकाणी शिस्तबद्ध नियोजन करूया.  

ऐतिहासिक परंपरेला साजेसा सत्कार

अ‍ॅड. महादेवराव आडगुळे  म्हणाले, कोल्हापूर ही ऐतिहासिक नगरी आहे. त्यामुळे हा नागरी सत्काराचा कार्यक्रम ऐतिहासिक परंपरेला साजेसा केला जाईल. सर्वांच्या सहभागाने कार्यक्रमाचे वेगळेपण जपण्यात येईल. अ‍ॅड. आडगुळे यांनी स्वागत समिती स्वतंत्रपणे निर्माण करण्याची मांडलेली  सूचना यावेळी बैठकीत तत्काळ मान्य करण्यात आली.  

स्क्रिनची व्यवस्था 

मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर म्हणाले, कार्यक्रमास मोठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन अनेक ठिकाणी स्क्रीन लावण्याचे नियोजन केले जाईल. कार्यक्रम लोकसहभागाचा आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी समितीची असणार आहे. 

लाला गायकवाड म्हणाले,  कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. यामध्ये मान्यवरांची संख्याही लक्षणीय असणार आहे. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी  शिवाजी स्टेडियम मैदानाचा विचार करण्यात आला तर सोयीचे होऊ शकेल. माजी नगरसेवक बाबा पार्टे म्हणाले, कार्यक्रमासाठी तालुकावार निमंत्रणे दिली तर अधिक सोपे होणार आहे.

माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी जिल्ह्यातील सर्व मान्यवरांना निमंत्रण देण्याची जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले, निमंत्रण देण्यासाठी तालुकानिहाय नावे निश्‍चित करण्यात आली आहेत. यानुसार  सर्वांना सूचना दिल्या जातील. 

कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. शिवाजीराव राणे व अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी विधीसेवेसंदर्भातील सर्व जबाबदारी आम्ही घेत असल्याचे जाहीर केले. जयकुमार शिंदे यांनी खासबाग, प्रायव्हेट हायस्कूल परिसरात स्क्रिनची व्यवस्था करण्याची सूचना मांडली.  

आरपीआयचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, हा सत्कार दैनिक ‘पुढारी’च्या पुरोगामित्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे या सत्काराचे स्वरुप हे लोकोत्सवाचे असेल. अशोक भंडारी, प्रा. विश्‍वास देशमुख आदींनी यावेळी सूचना केल्या. 

बैठकीला उपमहापौर महेश सावंत, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सौ. संगीता खाडे, शहराध्यक्षा वहिदा मुजावर, महापालिकेतील काँगे्रसचे गटनेते शारंगधर देशमुख, दिलीप पोवार, विनायक फाळके, मल्हार सेनेचे बबन रानगे, मनोहर कटाळे, कॉ. दिलीप पवार, महादेवराव चव्हाण, पतित पावन संस्थेचे सुनील पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, बजरंग दलाचे बंडा साळोंखे, मनसेचे प्रसाद पाटील, राजू जाधव, शेकापचे बाबुराव कदम, हॉटेल मालक संघाचे अरुण चोपदार, चित्रपट महामंडळाचे अरुण नलवडे, बाजीराव नाईक, भाऊसो काळे, माजी नगरसेवक अनिल कदम, रमेश मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, आरपीआय आठवले गटाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, कागल तालुकाध्यक्ष बी. आर. कांबळे, मराठा महासंघाचे अवधूत पाटील, चंद्रकांत यादव आदी उपस्थित होते.

नागरी सत्कार यशस्वी करूया : महापौर

डॉ. योगेश जाधव यांचा नागरी सत्कार हा लोकोत्सव स्वरुपाने  केला जाईल. यासाठी सर्व नियोजन काटेकोर केले जाणार असून, याबाबतची पूर्वतयारी सुरू आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडून हा नागरी सत्कार यशस्वी करूया, असे आवाहन  महापौर सौ. शोभा बोंद्रे यांनी केले. 

केशवराव भोसले नाट्यगृहाची आज समितीच्या वतीने पाहणी

केशवराव भोसले नाट्यगृहाची सोमवारी दुपारी 4.30 वाजता डॉ. योगेश जाधव सर्वपक्षीय नागरी सत्कार समितीच्या वतीने पाहणी करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. 

विविध उपसमित्यांची स्थापना

स्वागत समिती, व्यासपीठ समिती, निमंत्रण वाटप समिती, पाकिर्ंंग व्यवस्था समिती आदी समित्यांची स्थापना यावेळी करण्यात आली.  

वाहनांची पार्किंग व्यवस्था अशी असेल

प्रायव्हेट हायस्कूल पटांगण, शिवाजी स्टेडियम आदी ठिकाणी वाहनांच्या पार्कींगची सुविधा केली जाणार आहे. यासह व्हीआयपी पार्किंग व्यवस्था केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात करण्याचे नियोजन करण्यात आले.