Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Kolhapur › पानसरे हत्या : संशयित डॉ. तावडेला जामीन (Video)

पानसरे हत्या : संशयित डॉ. तावडेला जामीन (Video)

Published On: Jan 30 2018 4:09PM | Last Updated: Jan 31 2018 1:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे खून खटल्यातील आरोपी व ‘सनातन’चा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (वय 56, रा. पनवेल) याला मंगळवारी सशर्त जामीन मंजूर झाला. अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश (2) एल. डी. बिले यांनी हा निकाल दिला. 17 महिन्यांनंतर डॉ. तावडेला जामीन मंजूर झाल्याने ‘सनातन’ साधकांनी जल्लोष केला. समीरपाठोपाठ तावडेचा जामीन झाल्याने ‘एसआयटी’ला हा मोठा झटका समजण्यात येत आहे.

25 हजारांच्या जातमुचलक्यावर तावडेला जामीन मंजुरी देताना न्यायाधीशांनी पुढील आदेश होईपर्यंत आरोपीला कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास बंदी घातली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत प्रत्येक शनिवारी 11 ते 1 या कालावधीत कोल्हापुरातील ‘एसआयटी’ कार्यालयात उपस्थित राहून तपास प्रक्रियेत सहकार्य करायचे आहे. राज्य, देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

फिर्यादीसह अन्य साक्षीदारांवर दबाब आणू नये, कोल्हापूर वगळता ज्या ठिकाणी दैनंदिनी वास्तव्य राहणार आहे. तेथील सविस्तर पत्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पासपोर्ट तातडीने न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर्वपरवानगीशिवाय वास्तव्याचा पत्ता परस्पर बदलण्यासही मनाई करण्यात आली आहे.

डॉ. दाभोलकरपाठोपाठ  कॉ. पानसरे हत्येतही सहभाग

ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी तावडेला ‘सीबीआय’ने 2016 मध्ये अटक केली होती. कॉ. पानसरे हत्येच्या कटात डॉ. तावडेचा सहभाग निश्‍चित झाल्यानंतर 10 जून 2015 मध्ये तावडेचा ‘एसआयटी’कडे ताबा देण्यास ‘सीबीआय’ने अनुमती दिली होती. दि. 2 सप्टेंबर 2016 रोजी तावडेला येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते. सतरा महिन्यांनंतर तावडेला जामीन झाला आहे.

‘सीबीआय’ कोर्टाने तावडेचा जामीन फेटाळला

तावडेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि साथीदारांच्या मदतीने खुनाचा कट रचल्याचा ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’ने ठपका ठेवला आहे. तावडेने ‘सीबीआय’ कोर्टात दाखल केलेल्या जामिनावर सुनावणी होऊन 5 ऑक्टोबर 2017 मध्ये अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेवरील निर्णयावर तावडेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

साथीदार अकोळकरसह पवार फरार घोषित

तावडेसह समीर गायकवाड, सारंग अकोळकर, विनय पवारविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. समीर, तावडेला यापूर्वीच अटक झाली आहे. त्यापैकी अकोळकर, पवारला न्यायालयाने नुकतेच फरारी घोषित करून मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

तावडेविरुद्ध भक्‍कम पुरावे : विशेष सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद

डॉ. तावडे याच्या जामीन अर्जावर आक्षेप घेताना विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी जोरदार युक्‍तिवाद केला होता. कॉ. पानसरे दाम्पत्यावर चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला केला होता. त्यात कॉ. गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्याच्या कटात तावडेच्या प्रत्यक्ष सहभागाचे भक्‍कम पुरावे चौकशी अधिकार्‍यांच्या हाती लागले आहेत. आरोपीचा जामीन मंजूर झाल्यास खटल्याच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्‍त केली होती.

अप्रत्यक्ष सहभागाचाही धागा नाही : अ‍ॅड. पटवर्धन

तावडेच्या वतीने अ‍ॅड. समीर पटवर्धन, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेल्या युक्‍तिवादात तपास यंत्रणेवर टीकेची झोड उठविली. ‘सनातन’ संस्थेसह साधकांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याच्या उद्देशाने समीर गायकवाड व तावडेवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कॉ. पानसरे खुनाच्या तपासात आरोपींविरुद्ध प्रत्यक्षच काय; पण अप्रत्यक्ष एकही पुरावा हाती लागलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीला स्थागिती आदेश दिल्याने आरोपी आणखी किती दिवस कारागृहात खितपत ठेवणार? असा युक्‍तिवाद केला होता. न्यायालयाने हा युक्‍तिवाद ग्राह्य धरूनच तावडेला जामीन मंजूर केला आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड.पटवर्धन यांनी व्यक्‍त केली.

उच्च न्यायालयात आव्हान देणार : अ‍ॅड. राणे

डॉ. तावडेच्या मंजूर जामिनाला मुंबई उच्च न्यायालयात लवकरच आव्हान देण्यात येईल, असे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी पत्रकारांना सांगितले. खटल्याची पुढील सुनावणी येत्या 26 फेब्रुवारीला होणार आहे.

वाचा : गाडीच्या काचांना अजूनही पानसरेंच्या रक्ताचा वास : मेघा पानसरे