Wed, Apr 24, 2019 22:01होमपेज › Kolhapur › सदाशिवराव मंडलिक विधायकतेसाठी लढलेले नेते

सदाशिवराव मंडलिक विधायकतेसाठी लढलेले नेते

Published On: Mar 11 2018 1:21AM | Last Updated: Mar 11 2018 12:22AMहमीदवाडा : प्रतिनिधी 

विधायक व चांगल्या कारणांसाठी आयुष्यभर लढलेले लढवय्ये नेतृत्व म्हणजे लोकनेते सदाशिवराव मंडलिक होय, असे प्रतिपादन माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. येथील मंडलिक कारखान्याच्या प्रेरणा स्थळावर माजी खासदार लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या तिसर्‍या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रा. संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते. 

यावेळी प्रेरणा स्थळावरील सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन डॉ. डी. वाय. पाटील, प्रा. संजय मंडलिक, शरद कारखानीस यांच्या हस्ते झाले. 
डॉ. पाटील म्हणाले, ध्येयाचा जप माणसाला यशापर्यंत घेऊन जातो. कै. मंडलिक यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेला संघर्ष व मिळवलेले यश अभिमानास्पद आहे.अहंकार विरहित असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. तोच वसा प्रा. मंडलिक पुढे चालवत आहेत याचा आनंद आहे.

शरद कारखानीस म्हणाले, सदाशिवराव मंडलिक यांना योग्यवेळी राजकीय संधी मिळाली असती तर ते अजून खूप मोठे झाले असते.यशवंतराव मोहिते यांचे निष्ठावंत शिष्य असलेल्या मंडलिक यांना वास्तवाची जाणीव होती. महाराष्ट्र पातळीवर त्या काळात आश्‍वासक अशा 25 तरुणांची जी यादी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होती त्यामध्ये मंडलिक यांचे नाव होते.

यावेळी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक वीरेंद्र मंडलिक, भैया माने, युवराज पाटील, जि. प. सदस्या शिवानी भोसले , वैशाली मंडलिक,  प्राचार्य अर्जुन कुंभार, कार्यकारी संचालक एन. वाय.पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, दकार्यकर्ते, शेतकरी, सभासद उपस्थित होते. स्वागत जीवन साळोखे यांनी तर प्रास्ताविक प्रा. संजय मंडलिक यांनी केले. आभार प्रा. बापूसाहेब भोसले-पाटील यांनी मानले.

प्रतापसिंह जाधव यांचे जीवापाड प्रेम
 प्रा. संजय मंडलिक म्हणाले, साहेबांचे निधन झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आमच्यावर मुलाप्रमाणे जीवापाड प्रेम केले. आमचा कोणताही मोठा कार्यक्रम डॉ.प्रतापसिंह जाधव, डॉ. डी. वाय. पाटील व शाहू महाराज यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. असे सांगतानाच माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याही आठवणी त्यांनी जागवल्या.

 काय व्हायचं ते ठरवा
  डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, प्रा. संजय मंडलिक चांगले काम करत आहेत. वडिलांपेक्षाही ते पुढे जातील तसेच त्यांना जे व्हायचं असेल ते म्हणजे आमदार किंवा खासदार ते नक्की होतील. आता काय व्हायचं ते ठरवा.. आमदारकीही चांगली आहे अगदी राज्यपाल सुद्धा तुम्ही होऊ शकता.