होमपेज › Kolhapur › अर्भक विक्री प्रकरण : चंद्रपूर, मुंबई येथील दाम्पत्ये ताब्यात 

अर्भक विक्री प्रकरण : चंद्रपूर, मुंबई येथील दाम्पत्ये ताब्यात 

Published On: Feb 09 2018 6:57PM | Last Updated: Feb 09 2018 6:57PMइचलकरंजी : प्रतिनिधी

नवजात अर्भक विकत घेणार्‍या मुंबई आणि चंद्रपूर येथील दाम्पत्यांना शिवाजीनगर पोलिसांनी आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून या बालकांचा ताबा घेवून ती कोल्हापुरातील बालगृहाकडे सुपूर्त करण्यात आली. डॉ.अरुण पाटील याच्या दवाखान्यात प्रसुती झालेल्या एका विधवेचा मुलगा मुंबई येथील डॉक्टर व त्याच्या पत्नीने तर कुमारी मातेचा मुलगा चंद्रपूर येथील एका इंजिनिअरने विकत घेतला होता. या दोन्ही दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

अटकेत असणार्‍या डॉ.अरुण पाटील याने दिलेल्या जबाबानुसार त्याच्या दवाखान्यात प्रसुत झालेल्या विधवा आणि कुमारी मातेच्या अर्भकांना मुंबई व चंद्रपूर येथे विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. कोल्हापूर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि येथील शिवाजीनगर पोलिसांची दोन पथके जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दिनेश बारी यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या पथकाने गुरूवारी मध्यरात्री मुंबई व चंद्रपूर येथून या बालकांना ताब्यात घेतले. आज सकाळी अर्भक व दाम्पत्यांसह दोन्ही पथके इचलकरंजीत दाखल झाली.