होमपेज › Kolhapur › पुढारीकार ग.गो. जाधव स्‍मृतिदिन : भारतानं तंत्रज्ञान निर्यात करावे : डॉ. काकोडकर

पुढारीकार ग.गो. जाधव स्‍मृतिदिन : भारतानं तंत्रज्ञान निर्यात करावे : डॉ. काकोडकर

Published On: May 20 2018 5:54PM | Last Updated: May 21 2018 1:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे. त्याकरिता वाढीव ऊर्जेची गरज आहे. सौर आणि अणुऊर्जेमुळे त्या गरजा पूर्ण होतील, त्यासाठी दुसर्‍या देशाकडून तंत्रज्ञान आयात न करता स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, ती क्षमता भारतात आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी रविवारी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दै.‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित व्याख्यानमालेत ‘शाश्‍वत ऊर्जा सुरक्षा; आव्हाने व पर्याय’ या विषयावर ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव प्रमुख उपस्थित होते.

डॉ. काकोडकर म्हणाले, ऊर्जा ही फार जवळची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात प्रगती ज्या पद्धतीने होत आहे, ते पाहता आपल्या देशाला ऊर्जेची अधिक गरज आहे. पुढारलेल्या देशांतही ऊर्जेची गरज आहे. मात्र, त्याकरिता ते नवीन संयंत्रे बसवतील, असे नाही. जुन्याच संयंत्राचा वापर करून ते ऊर्जेची गरज पूर्ण करतील; पण भारतात वाढलेली ऊर्जेची गरज भागवायची असेल, तर नवीन संयंत्रे बसवावी लागतील.

ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स सुधारण्याची गरज

पुढारलेल्या देशांप्रमाणेच भारतातील जीवनमान उंचावयाचे असेल, तर सध्या वापरात असलेल्या ऊर्जेच्या चौपट ते पाचपट ऊर्जेचा वापर वाढणे गरजेचे आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, भारताचा ‘ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स’ सुधारलेला नाही. पुढारलेल्या देशात मात्र त्याचा स्तर वरचा आहे. या देशात आणखी ऊर्जा उपलब्ध करून दिली, तरी त्या देशांच्या ‘ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स’मध्ये फरक पडणार नाही. मात्र, भारतासारख्या देशात अशी ऊर्जा वाढवली, तर लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. 2400 किलोग्रॅमपर्यंत सरासरी ऊर्जेचा वापर होतो, तो वाढला पाहिजे. त्याकरिता चार बिलियन टनपर्यंत ऊर्जा निर्मिती वाढायला पाहिजे. या स्तरापर्यंत ऊर्जा निर्मिती करायची असेल, तर ऊर्जा निर्मितीवर भर दिला पाहिजे.

आयात हाच पर्याय असू नये

डॉ. काकोडकर म्हणाले, कोळसा, तेल, गॅस हेच सध्याचे ऊर्जा स्रोत आहेत, त्याचा वापर जास्त आहे आणि निर्मिती कमी आहे. म्हणून आपण परदेशातून तेल, कोळसा आयात करतो. ज्या प्रमाणात आपण परदेशातून ही साधनसामुग्री आयात करतो, त्याचे प्रमाण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील त्याची किंमत पाहता ती सतत वाढत जाणारी आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो, हे मोठे आव्हान आहे. आयातीत सर्वात मोठी ऊर्जा क्षेत्रासाठीची साधनसामुग्री आयात होते. हे प्रमाण पाच ते सात पटीने वाढले, तर त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर सातत्याने होत राहतील. याकरिता आपण पर्याय शोधले पाहिजेत. परदेशातून आयात करणे हा आपल्यासमोरील पर्याय असू नये, असेही त्यांनी सांगितले.

गॅस हायड्रेड ऊर्जा तीन-चारशे वर्षे पुरेल

जगात आता गॅस हायड्रेडवर चर्चा सुरू आहे; पण त्याचा वापर अजून सुरू झालेला नाही, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, समुद्राच्या तळाशी अनेक साठे आहेत, तिथे मिथेन वायू घनरूपात आहे. तो वर आणला तर त्याचे बाष्पीभवन होते. त्यासाठी तो सुरक्षित वर आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. भारत अशा गॅस हायड्रेडबाबत समृद्ध आहे. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा तीनशे-चारशे वर्षांची देशाची वाढीव गरज पूर्ण करू शकेल.त्याकरिता यावर लक्ष केंद्रित केले, तर येत्या काही वर्षात आपण ते साध्य करू शकतो. ज्या ठिकाणी कोळसा आहे, त्या ठिकाणीही मिथेन गॅस मिळतो. अशा ठिकाणी विहिरी खणून हा गॅस बाहेर काढला पाहिजे. हा गॅस बाहेर काढू शकतो का, त्याचे जेवढे उत्पादन होईल, तेवढा त्याचा वापर होईल का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता जेवढे लक्ष द्यायला पाहिजे होते, तेवढे दिले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

बायोगॅस : बिनधुराच्या चुली  निर्माण केल्या पाहिजेत

शेणाच्या गोवर्‍या, सरपण आदी बायोमासद्वारे होणार्‍या ऊर्जेचा 20 टक्के वापर केला जातो, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, या ऊर्जेचा परिणाम होतो. धूर निर्माण होतो, त्यातून प्रदूषण होते. हे प्रदूषणच होणार नाही, अशा चुली निर्माण केल्या पाहिजेत. गोवर्‍या पूर्णपणे जळतात, त्यातून द्रवरूप इंधन, गॅस निर्मिती केली, तर त्याचा अधिक उपयोग होईल. आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे, पिकाच्याही शिल्लक राहणार्‍या घटकांपासून बायोगॅस निर्माण करण्यात येत आहे. यामुळे बायोगॅसचे प्रमाण वाढणार आहे. हायड्रो कार्बन, तेल आदींच्या वापराने जेवढे इंधन निर्माण होईल, तेवढे इंधन बायोमासमधून निर्माण करू शकतो, चार-पाच वर्षांत अशी परिस्थिती निर्माण होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्‍त केला.

निसर्गातील सर्व ऊर्जा आहे तशी वापरता येत नाही, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, विजेच्या उपयोगाने सर्व गरजा भागवू शकणार नाहीत. मात्र, वाहने विजेवर चालायला लागली की तेलाची आवश्यकता कमी होईल. वीज आणि गॅस यांच्या वापराचे प्रमाण वाढेल, तर कोळसा आणि तेल याचा वापर कमी होईल. त्यातून ऊर्जेचे नवीन संसाधन शक्य आहे. कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत नाही, अशा ऊर्जेचे उत्पादन केले पाहिजे. कोळशापासून वेगवेगळ्या देशांत गॅस निर्मिती केली जाते. भारतातील कोळशात राखेचे प्रमाण अधिक असल्याने ते शक्य झाले नाही; पण  त्यावर सर्वांनी काम केले पाहिजे, हे चित्र बदलले पाहिजे.

बॅटरी डेव्हलपमेंट

बॅटरी डेव्हलपमेंट ही जगभर चालू असलेली प्रक्रिया आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, बॅटरी तीस वर्षे टिकेल, एकूण विजेच्या, ऊर्जेच्या कमीत कमी खर्च येेईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौरऊर्जेची निर्मिती ‘डीसी’ असते. इन्व्हर्टर लावून त्यावर ‘एसी’ची उपकरणे वापरता येतात, यामुळे अशी व्यवस्था पुढे आली पाहिजे. तंत्रज्ञान वाढवण्याचे काम केले पाहिजे, त्याला चालना देण्याचे काम केले पाहिजे. सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज, वाफेची निर्मिती होऊ शकते, रासायनिक प्रक्रिया करून पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन तयार करता येईल, यादृष्टीने बीएआरसी, ओएनजीसी आदींचे काम सुरू आहे. सोलर थर्मलच्या माध्यमातूनही आयआयटीचेही काम सुरू आहे. देशात अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. 700 मेगावॅटच्या 10 अणुभट्ट्या निर्माण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे अणुऊर्जा क्षमतेचा वेग वाढेल. सुमारे 48 ते 49 हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती यामुळे साध्य होणार आहे.

स्वच्छ ऊर्जा निर्माण होण्याची आवश्यकता

वातावरणातील बदलाचा सामना करणारी, स्वच्छ ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, त्याकरिता स्वत:चे आराखडे केले पाहिजेत. सातत्याने संशोधन सुरू राहिले पाहिजे. तंत्रज्ञानातून पुढे आलेले काम सतत चालू राहिले पाहिजे. पुढारलेल्या देशांत तंत्रज्ञान आयात करत नाहीत असे नाही, तिथेही तंत्रज्ञान आयात होते. मात्र, आयात केलेल्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक तंत्रज्ञान ते निर्यात करत असतात. भारतात स्वत:च्या बळाचा वापर करून संशोधन वाढवले पाहिजे. आपले तंत्रज्ञान अनेकदा परदेशातील ‘व्हेंडर’वर अवलंबून असते. ते जे सांगतात, ते कधीच खरे नसते; पण त्यावरच आपण अवलंबून राहतो आणि ते खरेदीही करत असतो. पण, देशाची प्रगती साधायची असेल, तर ऊर्जा क्षेत्रात भारताने स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, क्‍लिष्ट असा विषय डॉ.काकोडकर यांनी सहज, सोप्या भाषेत मांडला. लोकांचे राहणीमान सुधारायचे असेल, तर महत्त्वाचे उद्दिष्ट ऊर्जा आहे. मानवी विकास निर्देशांकात 188 देशांच्या यादीत इराक, इराण, चीन, ब्राझील अगदी श्रीलंकेसारखाही देश आपल्या वर आहेत. भारताचा 131 वा क्रमांक आहे. भारतासाठी हे चित्र चांगले नाही. ऊर्जेची प्रगती शाश्‍वत असावी त्याकरिता काय करावे, याबाबत स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करावे, असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. यामुळे अनेक प्रश्‍न सुटतील, असा विश्‍वास यावेळी शिर्के यांनी व्यक्‍त केला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेले पुस्तक देऊन डॉ. काकोडकर यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. ग. गो.जाधव पत्रकारिता अध्यासनाचे प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे, उपकुुलसचिव जी. एस. राठोड, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अधीक्षक आर. आय. शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. ग. गो. जाधव यांचा वारसा समर्थपणे पुढे जात आहे

स्वातंत्र्यपूर्व काळातील एक अख्खी पिढी झपाटलेल्या माणसांची होती, त्यांनी अथक प्रयत्नांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर सामाजिक, शैक्षणिक आदी सुधारणा नेटाने पुढे नेल्या, त्या परंपरेत डॉ. ग. गो. जाधव यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, पत्रकारिता हे एक साधन मानून डॉ. ग. गो. जाधव यांनी विविध क्षेत्रात योगदान दिले. त्यांनी ज्याप्रकारे सामाजिक काम केले, त्यांचा हा वारसा ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव समर्थपणे पुढे चालवत असल्याचे गौरवोद‍्गारही डॉ. काकोडकर यांनी काढले. प्रथितयश दैनिक म्हणून ‘पुढारी’ची ओळख आहेच; पण त्याचे समाजकार्यही सर्वश्रुत आहे. सर्वोच्च रणभूमी असलेल्या सियाचीन येथे ‘पुढारी’च्या पुढाकाराने सैनिकांसाठी हॉस्पिटल बांधले, गुजरातमध्ये भूज येथेही अशाच प्रकारचे हॉस्पिटल बांधले. हा समाजकार्याचा मोठा वारसा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

व्हिडिओ 

 

Tags : Daily pudhari, Editor, Dr g Go Jadhav, Memorial Day, dr anil kakodkar, kolhapur