Tue, Apr 23, 2019 23:55होमपेज › Kolhapur › शतकातील मोठ्या चंद्रगहणाची भीती नको

चंद्रग्रहणाचे गर्भातील बाळावर परिणाम? वाचा

Published On: Jul 27 2018 8:11AM | Last Updated: Jul 27 2018 8:55AM डॉ. सौ. सरोज शिंदे

आज (दि.१७) या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण पाहण्याचा आपल्याला एक अद्‌भूत अनुभव मिळणार आहे. हे नयनरम्य दृष्य खरे तर सर्वांनी बघायला हवे. निसर्गाचे गोंडस रूप आपण आपल्या डोळ्यांत साठवले पाहिजे.

अहो आम्ही तर ग्रहण अशुभ मानतो! ग्रहण तर गरोदर स्त्रियांसाठी एक शिक्षाच. अगदी गेल्या महिन्यात अनुभवलेल्या 2 प्रसंगांनी मी पूर्ण हादरून गेले. एक अतिशय सुशिक्षित, अमेरिकेत कॉम्पुटरच्या कंपनीत काम करणारी 5 वा महिना चालू असलेली गरोदर स्त्री, ग्रहण पाळायचे म्हणून अमेरिकेतून माहेरी कोल्हापूरला आली आणि मला भेटली. दुसर्‍या घटनेत एका गरोदर स्त्रीला काही कारणामुळे माहेरी ‘ग्रहण पाळता’ आले नाही म्हणून, माझ्या बाळावर त्याचा परिणाम होणार या भीतीपोटी कायमस्वरूपी माहेरी राहा, परत सासरी येऊ नको, असा धमकावणारा उच्चशिक्षित नवरा मी पाहिला. या दोन्ही घटनांनी मला पूर्ण हादरवून टाकले. ग्रहण का होते आणि गर्भामध्ये दोष का उत्पन्न होतात. याची कुठलीही शास्त्रीय माहिती न घेता पूर्वापर चालत असलेल्या गोष्टी आंधळेपणाने पुढे चालवणार्‍या या आधुनिक पिढीला सुशिक्षित म्हणायचे का, हा मोठा प्रश्‍न आहे. 27 जुलैला चंद्रग्रहण आहे; पण जवळजवळ 1 महिना आधीपासून सर्व गरोदर स्त्रिया व त्यांच्या घरातील लोकांचे प्रश्‍न सुरू झाले आहेत. प्रचंड भीती, शंका यामुळे त्यांना घेरले आहे. 

‘विषाची परीक्षा’ म्हणजे गर्भावर ग्रहणाचे वाईट परिणाम होणार. ज्यामध्ये दोष निर्माण होणार आदी. याचा कुठलाही शास्त्रीय पुरावा जगात कुठेही नाही. भारत सोडून जगात कुठेही ग्रहण पाळणे ही संकल्पना नाही आणि त्यामुळे जगात कुठेही गर्भावर वाईट परिणाम अथवा व्यंगात्मक बाळ झाल्याचा पुरावा नाही. मुळात बाळामध्ये व्यंग का निर्माण होते व ग्रहण म्हणजे काय याची शास्त्रीय माहिती करून घ्यायची तसदी कुणीही करत नाही.

गरोदरपणात कुठल्या तरी बाळाला कधी ना कधी तरी काही तरी दोष असतात. हा निसर्ग नियम आहे. 96 टक्के ते 97 टक्के बाळ पूर्ण निर्दोष असतात, तर थोड्या बाळांमध्ये दोष असतोच. ओठ फाटणे, बोटे जुळणे, पाठीचा कणा दुभंगलेला असणे इत्यादी गोष्टींची अनेकविध शास्त्रीय कारणे आहेत. काही गुण सूत्रांच्या दोषांमुळे, तर काही गुणसूत्रांच्या संरचनेमुळे होतात. बाळाच्या अवयवांची रचना ही तीन ते साडेतीन महिन्यांपर्यंत जवळजवळ पूर्ण झालेली असते. नंतर गर्भ फक्त वाढत असतो. त्यामुळे बाळ पूर्ण निरोगी असणे हे तेव्हाच ठरते. त्याच्या रचनेत दोष असणे. (ओठ फाटणे, बोट जुळणे, मणका उघडा असणे, मणक्यावर गाठ असणे इत्यादी) हेही तेव्हाच ठरते. त्यामुळे नंतर ग्रहण पाळून त्यात काहीही बदल होत नाही.

वर्षभरात 4 ते 7 ग्रहणे होतात. सगळी आपल्याकडे दिसत नाहीत, तरी पाळली तरी नक्कीच जातात. ग्रहणाचे वेध लागल्यापासून ते ग्रहण पूर्ण सुटेपर्यंत गरोदर स्त्रीने काहीही खायचे नाही. पाणीसुद्धा नाही, तिने एकाच जागी बसायचे. झोपायचे नाही, जागं राहायचं. तिनं भाजी चिरली की बाळाचे ओठ फाटणार, तिनं बोटे जुळवली की गर्भाची जुळणार. ती बाहेर फिरली तर बाळ काळं पडणार इत्यादी इत्यादी. केवढं टेन्शन त्या बाईला! केवढा हा घोर अन्याय! कुठल्याही पुस्तकात याविषयी शास्त्रीय माहिती नाही की पुरावे नाहीत.

ग्रहण पाळण्याचे तोटेही अनेक आहेत. गरोदरपणात खूप भूक लागते. गरोदरपणात उपाशी राहिल्यास रक्तातील साखर उतरते.  रक्तदाब कमी होते. चक्कर येते. बाळाच्या रक्तातील साखर आईच्या रक्तातील साखरेवर अवलंबून असते. त्यामुळे त्या बाळाचापण उपवास घडतो; पण हे कुणालाच कळत नाही. एकाच जागी बसून रक्तपुरवठा मंदावून हातापायांत मुंग्या येतात. क्वचित रक्ताचा वेग मंदावून गुढळ्या होतात आणि ते खूप धोक्याचे असते. पाणी प्याले नाही की लघवी कमी होते. आपल्या मूत्राशयाच्या मार्गात जंतू असतातच ते त्यामुळे वाढतात व जंतू मूळ धरतात. मूत्रमार्गाचे इन्फेक्शन वाढते. ते बाळाच्या वाढीवर दुष्परिणाम करते. 

अशा या सर्व दिव्यातून पार जाऊन एका नव्या गोंडस बाळाला जन्म देणार्‍या त्या आईला तिचे आईपण म्हणजे तृप्ती असते. सुखाची भावना असते. तिचे मातृत्व म्हणजे वेदना असते. कसोटी असते. तिचे वास्तवात असलेले एक स्वप्न असते. नऊ महिन्यांची कठोर परीक्षा पार पाडून दोन आश्‍वासक हातांनी एक जीव तिला मोठा करायचा असतो. तेच तिच्या आयुष्याचे सार्थक असते.

रात्री 11.54 वा. प्रारंभ; पहाटे 3.49 वा. समाप्ती

चंद्र 11.54 वाजता पृथ्वीच्या पश्‍चिम बाजूने विरळ छायेमध्ये प्रवेश करणार आहे. खग्रास स्थिती मध्यरात्री 1 वाजता सुरू होणार आहे. ग्रहणमध्य 1.52 रोजी होणार आहे. खग्रास स्थिती 2.43 वाजता संपेल व चंद्र विरळ छायेतून दिसायला लागेल. पहाटे 3.49 वाजता ग्रहणाची समाप्ती होणार आहे.