Thu, Aug 22, 2019 04:16होमपेज › Kolhapur › गेले गाढव कुणीकडे?

गेले गाढव कुणीकडे?

Published On: Feb 09 2018 2:19AM | Last Updated: Feb 05 2018 11:44PMकौलव : राजेंद्र दा. पाटील

एकेकाळी गोरगरीब कष्टकर्‍यांच्या रोजीरोटीसाठी स्वत:च्या पाठीवरून ओझी वाहणारे गाढव काळाच्या ओघात दुर्मिळच झाले आहे. एरव्ही रस्त्यावरून अस्ताव्यस्तपणे चालत वाहतुकीला अडथळा आणणारे गाढवाचे कळप गायब झाले आहेत. यांत्रिकीकरण व घटती उत्पत्ती यामुळे कष्टकर्‍यांचा हा साथीदार इतिहास जमा होण्याच्या मार्गावर असून गाढव गेले ओझ्याने अशी अवस्था झाली आहे.
पूर्वी कुंभार व बेलदार समाजातील लोक ओझी वाहण्यासाठी गाढवांचा वापर करत होते. कुंभारांच्या वीट भट्टीवर माती तसेच तयार वीटा ओढण्यासाठी गाढवांचा वापर केला जात होता. गाढवाच्या पाठीवर पोत्यात माती अथवा वीटा भरून लादल्या जात होत्या. तर बेलदार समाजातील लोक केवळ दगडापासून पाटे, वरवंटे, खलबत्ते बनवून ते गाढवाच्या पाठीवर लादून गावोगावी त्याची विक्री करत होते. बिचारे गाढव ही सर्व कामे निमुटपणे करत होते. यांत्रिकीकरणामुळे कुंभार समाजाला गाढवाची गरज उरली नाही. बेलदार समाजाचा पाटे वरवंटे, खलबत्त्याचा पारंपारिक व्यवसायही ग्रायंडर मिक्सरच्या जमान्यात संपुष्टात आला आहे. त्यामुळे गाढवाची गरजच उरली नाही. आंध्रप्रदेशात गाढवाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. 

गाढव हा तसा भटका प्राणी असल्याने रस्त्याने वा माळरानावर मिळेल तो पालापाचोळा खाऊन ते आला दिवस ढकलत असते. त्यामुळे त्याच्या पालन पोषणाचा खर्चही नगण्यच. मात्र काळाच्या ओघात कष्टकर्‍यांचा जीवाभावाचा साथीदार इतिहास जमा व्हायच्या मार्गावर आहे. जयसिंगपूर, पंढरपूर, सांगोलासह सोलापूर, विजापूर जिल्ह्याच्या काही भागात मोजक्या संख्येने गाढवे आढळतात. कोल्हापूर जिल्ह्यात वीट हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यात गाढवे येतात. जेजूरी येथे दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. मात्र तेथील आवक - जावकही आता मंदावली आहे. या बाजारात एका गाढवाची किंमत बारा ते पंधरा हजारापर्यंत असते व एक गाढव किमान दहा वर्षे ओझी वाहू शकते. असे कोगे (ता. करवीर) येथे गाढवाचा कळप घेऊन आलेले शामराव जाधव (सांगोला) यांनी सांगितले. काळाच्या ओघात अपार कष्टाचे प्रतिक असलेले गाढवच इतिहास जमा होत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातून सर्रास दिसणार्‍या गाढवाचे दर्शनच दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे आगामी पिढ्यांना गाढवाचे वर्णन केवळ पुस्तकातच वाचायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.