Wed, Sep 19, 2018 19:08होमपेज › Kolhapur › चिमुरड्यांसह 25 जणांना कुत्र्याचा चावा

चिमुरड्यांसह 25 जणांना कुत्र्याचा चावा

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 05 2018 12:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

टेंबलाईवाडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 25 जणांचा चावा घेतला. एक वर्षाच्या चिमुकलीसह तीन बालके, दोन महिला गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. पिसाळलेल्या कुत्र्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांतून होत आहे.

शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास टेंबलाईवाडीतील पाटील गल्ली, हनुमान गल्ली, अष्टविनायक कॉलनी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. घरासमोर खेळणार्‍या स्वरा प्रशांत हावळ (वय 1, पाटील गल्ली) हिच्या कानाला चावा घेत खेचत नेले. तसेच पाठीलाही गंभीर जखम झाली आहे. यासह इंद्रनील संभाजी कांबळे (4, अष्टविनायक कॉलनी) याच्या कपाळाला सात टाके पडले असून, हाताला गंभीर दुखापत झाली. करण संतोष देसाई (10, रा. हनुमान गल्ली), गुंजन गजानन माने, वैष्णवी सतीश पाटील, ईश्‍वर रवींद्र वाघमारे या बालकांसह लक्ष्मी ब्रह्मदेव यादव (45), सुरेखा सोनाजी वासुदेव (36), विनायक नाना काटे, अमित विजय मुंगळीकर, सौरभ सतीश पिंगळे यांना कुत्र्याने चावा घेतला. तर कुत्रे पाठीमागे लागल्याने पळताना पडल्याने काहीजण जखमी झाले. अनेकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

टेंबलाईवाडी, विक्रमनगर परिसरात गेले काही दिवस कुत्र्यांचा उच्छाद सुरू आहे. पिसाळलेल्या कुत्र्यामुळे नागरिकांना इतरत्र फिरणेही मुश्कील बनल्याने त्याचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर जखमींच्या नातेवाइकांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या.