होमपेज › Kolhapur › पिसाळलेल्या कुत्र्याचा 9 जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा 9 जणांना चावा

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने टाऊन हॉल उद्यान, मटण मार्केट, अकबर मोहल्ला पोस्ट ऑफिस कार्यालयासह महाराणा प्रताप चौकात केलेल्या हल्ल्यात चार वृद्धांसह नऊजण जखमी झाले. बुधवारी दुपारी ही घटना घडली.भीमराव कृष्णा पाटील (वय 59, रा. कांडगाव, ता. करवीर), अझरूद्दीन नजीर जमादार (27, खाटीक मंडई), अशोक जयसिंग रजपूत (59, रजपूतवाडी, ता. करवीर), धनाजी दिनकर पाटील (44, कसबा ठाणे, पन्हाळा) ओंकार  विष्णू बल्लाळ (13, राजेंद्रनगर), शफिक अब्दुल आत्तार (60, शनिवार पेठ), रामभाऊ सूर्यकांत पांडव (32, महाराणा प्रताप चौक) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींसह नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात गर्दी केली होती. पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी चौकातील तरुणांसह महापालिका आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण ते हाताला लागले नव्हते.

मध्यवर्ती बाजारपेठेतून पिसाळलेल्या कुत्र्याचा पाठलाग केल्याने भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक, मटण मार्केट, महाराणा प्रताप चौकातील वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती. दुपारी दीडच्या सुमाराला पिसाळलेल्या कुत्र्याने टाऊन हॉल उद्यानात धूमाकूळ घातला. झाडाखाली विश्रांती घेणार्‍या वृध्दासह मुलांवर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला चढविला. भीमराव पाटील यांच्या पाठीचा लचका तोडत त्यांना अक्षरश: लोळवले. अशोक रजपूत याच्या पायाचा लचका तोडला. ओंकारच्या पायालाही जखम झाली आहे. मोकाट कुत्र्याच्या हल्ल्याने मध्यवर्ती परिसरात घबराट निर्माण झाली होती.