Wed, Mar 27, 2019 01:58होमपेज › Kolhapur › ‘सुपारी’ टोळ्यांची दहशत

‘सुपारी’ टोळ्यांची दहशत

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:44AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : दिलीप भिसे

‘सुपारी’बाज टोळ्यांनी जिल्ह्यात दहशत माजविली आहे. स्थावर मालमत्ता, किंबहुना दंडूकशाहीच्या बळावर जागा खाली करून देण्यासाठी टोळ्यांत स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसून येते. ऑक्टोबर 2017 ते 10 जानेवारी 2018 या काळात प्रशासनाला आव्हान देत निष्पापांवर हल्ला करणार्‍या जिल्ह्यातील ‘सुपारी’बाजांसह 24 सराईतांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे सोकावलेल्या टोळ्यांची दुकानदारी मोडण्यासाठी प्रभावी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ची गरज निर्माण झाली आहे.

दंडूकशाहीच्या बळावर फैसला...थेट कायद्याला आव्हान देणार्‍या टोळ्यांनी  दहशत निर्माण केली आहे. जिल्ह्यात ‘सुपारी’बाजांच्या वाढलेल्या घटना चिंता वाढविणार्‍या आहेत. 

मिळकतीचा जोडधंदा तेजीत

वर्षानुवर्षे प्रलंबित वादावर तोडगा काढण्यासाठी म्होरक्यांनी पडद्याआड राहून बलदंड शरीरयष्ठीच्या तरुणांना हाताशी धरून मिळकतीचा जोडधंदा सुरू केला आहे. जीवघेण्या शस्त्रांसह हातात दंडुके घेऊन निष्पापांना झोडपून काढत गुंडागिरीचा कळस गाठला आहे.  शाहूपुरीत घडलेली घटना त्याचे उदाहरण होय. टोळ्यांवर कायद्याचा धाक आहे की नाही, याबाबत शंका आहे.

तरणीबांड पोरंही गुरफटताहेत...

गेल्या काही वर्षांत सांगलीसह कर्नाटकातील ‘सुपारी’बाज टोळ्यांची कोल्हापूर जिल्ह्यात चलती होती. स्थावर मालमत्तेच्या किमतीवर आधारित टक्केवारीत ‘सुपारी’चा सौदा ठरायचा... कालांतराने बिनभांडवली धंद्यात शहरासह जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारही सक्रिय होऊ लागले. अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील तरणीबांड पोरं ‘सुपारी’बाजांच्या चक्रात गुरफटू लागली आहेत.