Thu, Apr 25, 2019 21:35होमपेज › Kolhapur › कागल नगरपालिकेला मिळेना पूर्णवेळ मुख्याधिकारी

कागल नगरपालिकेला मिळेना पूर्णवेळ मुख्याधिकारी

Published On: Feb 12 2018 1:53AM | Last Updated: Feb 11 2018 11:07PMकागल : बा. ल. वंदूरकर

स्वच्छता आभियान, हागणदारीमुक्त शहर या व इतर वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे कागल नगरपालिकेला देशात आणि राज्यात गौरवाचे स्थान निर्माण होऊन पालिका राज्यात अव्वल ठरत असताना पालिकेला मात्र गेल्या चार - पाच महिन्यांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही. राज्य शासनाकडील विविध प्रकारची 18 पदे रिक्त आहेत. मालमत्तामधून मिळणार्‍या उत्पन्नाला बे्रक लागत आहे. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर फारसे नियंत्रण राहिले नाही, पालिकेच्या कार्यालयाला आग लागली, विकासकामाला गती राहिली नाही, असे अनेक प्रश्‍न सध्या पालिकेला भेडसावत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर पालिकेला सध्या कडक प्रशासकाची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेने विकासकामात आघाडी घेतली आहे. विविध वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे राज्यात आणि देशात पालिकेचा गौरव होत आहे. घनकचर्‍यापासून विजेची निर्मिती करणारी कागल नगरपलिका राज्यात आदर्श ठरली आहे. हागणदारीमुक्त योजनेमध्ये आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये तर राज्यात पालिकेचा गौरव झाला आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये तर नुकताच राज्यात तिसरा क्रमांक आल्याचे सांगण्यात येत आहे. ही उत्तुंग कामगिरी मुख्याधिकारी आणि प्रमुख अधिकारी यांची पदे रिक्त असताना देखील केली आहे. 

पालिकेच्या मुध्याधिकारी टिना गवळी यांची सप्टेंबर 2016 रोजी नियुक्ती झाली. मात्र, त्यांनी पूर्णवेळ पालिकेच्या कामकाजाला कधी दिलेच नाहीत. सतत दुपारनंतरच कार्यालयात हजर राहणेच त्यांनी पसंत केले. त्यामुळे त्यांचे पालिकेच्या कामकाजावर फारसे नियंत्रण राहिले नाही. गेल्या 28 नोव्हेंबरपासून त्या दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्या आहेत. मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सध्या जयसिंगपूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे देण्यात आला आहे. ते आठवड्यातून गरज असेल त्यावेळी एक-दोन दिवस येत असतात. या सर्व प्रकारामुळे नागरिकांना, पदाधिकार्‍यांवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा प्रकारामुळे प्रशासनाचा धाकच राहिला नाही. पालिकेच्या अ‍ॅम्युझमेंट पार्क, बोटिंग क्लब, जलतरण तलाव, बगीचा, क्रीडांगण, कॅन्टीन, दुकान गाळे, हॉल तसेच इतर उत्पन्नाच्या स्त्रोतापासून मिळणार्‍या पुरेशा उत्पन्नाला बे्रक लागला आहे. यापासून मिळणारे उत्पन्न किती आणि त्यांच्यावर होणारा खर्च किती याचा ताळमेळ लावला जात नाही. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर देखील नियंत्रण राहिले नाही. कामात कोणत्याही प्रकारची शिस्त राहिली नाही. सिस्टीमचा तर पत्ताच उरला नाही. मुख्याधिकारी नसताना देखील पालिका राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चांगले काम करून गौरव प्राप्त करीत असेल तर चांगल्या कडक प्रशासकाची नेमणूक झाल्यास याच्यापेक्षा देखील अधिक चांगले काम होऊ शकणार आहे.

दरम्यान, दीर्घ मुदतीच्या रजेवर गेलेल्या मुख्याधिकारी टिना गवळी या रजा पूर्ण झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये पुन्हा कामावर रुजू होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्या पूर्वीप्रमाणेच दुपारनंतरच कार्यालयात येणार काय? असा प्रश्‍न सध्या पालिका वर्तुळात उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्यात आदर्श ठरणार्‍या पालिकेचा कार्यभार कडक प्रशासकाकडेच देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.