Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Kolhapur › खासदार महाडिकांचे काम राष्ट्रवादीविरोधी : मुश्रीफ

खासदार महाडिकांचे काम राष्ट्रवादीविरोधी : मुश्रीफ

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 10:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्या पक्षाने उमेदवारी देऊन लोकसभेत पाठवले, त्याच राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात खा. धनंजय महाडिक काम करत आहेत. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले आहे. आमचे खासदार हे भाजप-ताराराणीचे नेते असल्याचा टोला आ. हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. तसेच पक्षाकडून आदेश आल्यास माझी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी केले.

आ. मुश्रीफ म्हणाले, धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. ते पराभूत झाले तर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मी घोषणा केली होती. महाडिकांना निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांच्याशी असलेले मतभेदही मिटवले. मोदींची लाट असतानाही आम्ही मोठ्या ताकतीने महाडिकांना निवडून आणले. मात्र, महाडिकांनी पुढील सहा महिन्यांतच महापालिका निवडणुकीत ताराराणीच्या उमेदवारांना मदत केली. पक्षाच्या विरोधात तुम्ही ताराराणीचे उमेदवार देत आहात हे योग्य नाही, असे मी महाडिक यांना सांगितले होते. मात्र, आप्पांच्या विरोधात जाऊ शकत नसल्याचे खा. महाडिक यांनी तेव्हा स्पष्टीकरण दिले होते. 

जिल्हा परिषद निवडणुकीत तर खा. महाडिक यांनी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या व्होल्वो वाहनाचे सारथ्यच केले. त्यांची पक्षाविरोधातील ही भूमिका आपणाला चांगलीच खटकली. महाडिक हे आपला खूप आदर करतात. भेटेल तिथे सन्मान करतात. ही त्यांची संस्कृती आहे. त्यांचे माझे वैयक्तिक मतभेद नाहीत. पक्षीय राजकारण करताना नातेसंबंध विसरून काम करणे आवश्यक होते. त्यांनी मात्र पक्षाच्या विरोधातच भूमिका घेतली. त्यामुळे आगामी काळात लोकसभा निवडणूक लढावी लागलीच, तर त्याची आपण तयारी केली आहेे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीकडून प्रा. संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा सुरू होती, याबाबत विचारले असता, प्रा. मंडलिक हे शिवसेनेत आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळेच आपण तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका स्थायी समिती सभापती निवडीत खा. महाडिक यांचा काही संबंध आहे का, असे विचारले असता, आ. मुश्रीफ यांनी असा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. इचलकरंजीत भाजपला पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर अद्यापही कारवाई झाली नसल्याबाबत विचारले असता, भाजप सत्तेत असल्याने कारवाईस विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.