Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Kolhapur › शाहू महाराजांच्या ‘भारतरत्न’साठी लोकचळवळ उभारणार : खा. महाडिक

शाहू महाराजांच्या ‘भारतरत्न’साठी लोकचळवळ उभारणार : खा. महाडिक

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पुरोगामी विचारांचे प्रणेते आणि समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांनी लोककल्याणकारी राज्यकारभार केला. त्यामुळेच ते लोकराजा ठरले. अशा या लोकोत्तर राजाला आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा यासाठी  कोल्हापुरात लोकचळवळ उभारणार असल्याची माहिती खा. धनंजय महाडिक यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत  जनरेटा वाढवण्यासाठी  सर्व संस्था, संघटना, व्यक्ती आदी सर्वांनीच 25 ऑगस्टपर्यंत माझ्या  कार्यालयाच्या पत्त्यावर शाहू महाराजांना भारतरत्न किताब द्यावा, या आशयाचे मागणीपत्र पोस्ट, ई-मेलच्या माध्यमातून पाठवावे. ही सर्व मागणीपत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेटून दिली जातील, असेही त्यांनी सांगितले. 

खा. महाडिक म्हणाले, शिक्षण, शेती, सिंचन, उद्योग, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्राला राजर्षी शाहू महाराजांनी न्याय देत चालना दिली. अस्पृश्यता निवारण, सर्वांना शिक्षण, समता-बंधुता याबद्दल त्यांनी कृतिशील योगदान दिले आहे. कोल्हापूरच्या जडणघडणीत व प्रगतीत शाहूंचा सिंहाचा वाटा आहे. अशा या  राजाला भारतरत्न हा किताब जाहीर व्हावा, अशी मागणी मी नुकतीच संसदेत केली.  या मागणीचे सर्व स्तरांतून स्वागत झाले. देशातील अनेक खासदारांनी या मागणीसाठी समर्थन देण्याचे सांगितले आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवण्यासाठी जनतेचा रेटा आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला सोबत घेऊन लोकचळवळ उभारण्याचे ठरवले आहे. यासाठी सेवाभावी संस्था, संघटना, विकास सोसायट्या, आमदार, ग्रामपंचायत, सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, शिक्षक संघटना, विविध समाज संघटना, व्यावसायिक, विद्यार्थी संघटना, तालीम व तरुण मंडळे, शिक्षण संस्था आदींनी हिंदी किंवा इंग्रजीत पत्र तयार करावे. हे पत्र खा. महाडिक यांच्या राजेश मोटर्सशेजारील कार्यालयात 25 ऑगस्टपूर्वी पाठवावे. 

मागणीपत्रे पंतप्रधानांना देणार
माझ्याकडून राजर्षी शाहू महाराजांचा चरित्रग्रंथ सर्व खासदारांना देण्यात येईल. तसेच देशातील सर्व खासदार व आमदारांनाही मागणीपत्र पाठवण्याबाबत विनंतीपत्र पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांनाही याबाबतचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली जाणार आहे. जमा झालेली सर्व मागणीपत्रे व प्रस्ताव राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना भेटून दिली जातील. दरम्यान, ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत याबाबतचा ठराव करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.