Wed, Aug 21, 2019 19:04होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीविरोधी काम केल्याचे पुरावे द्या

राष्ट्रवादीविरोधी काम केल्याचे पुरावे द्या

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मला खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी अनेक पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मदत केली आहे, म्हणून महापालिका निवडणुकीत मी तटस्थ भूमिका घेतली; पण म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला, असा त्याचा अर्थ होत नाही. आरोप करणार्‍यांनी तसे पुरावे द्यावेत, असे आव्हान खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केले. मी राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता असून आगामी लोकसभा निवडणूक लढवून विजयी होणार, यासाठी आ. हसन मुश्रीफ यांच्यासह मतदार संघातील सर्व नेतेमंडळी मला मदत करतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद व महापालिकेच्या सर्वपक्षीय सदस्यांना दिल्लीला  अभ्यास दौर्‍यासाठी घेऊन जाणार असल्याचे खा. महाडिक म्हणाले. पण या दौर्‍याला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जाऊ नये, असा निरोप आ. मुश्रीफ यांनी दिला आहे.

याबाबत  महाडिक यांना विचारता, माझा सदस्यांना बोलावण्याचा हेतू प्रामाणिक आहे. कोणी काय करायचे, हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न आहे. त्यांनी असे सांगण्याचे काय कारण आहे, हे त्यांनाच विचारावे.

मनपा राजकारणाशी संबंध नाही
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी विरोधी आघाडीच्या सदस्यांना जाहीरपणे मतदान केले. याबाबत विचारता, महापालिकेच्या राजकारणात मी कधीही लक्ष घातले नाही; पण जे झाले ते चुकीचे झाले, असेही महाडिक यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर दौर्‍यावर आले असता भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक तुमच्यासोबत कसे असे विचारता, ते खासदार म्हणून नाही, तर धनंजय महाडिक म्हणून माझ्याबरोबर आले होते, असे त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणार आहे. यासाठी सर्व पक्ष व संघटनांचे नेते व कार्यकर्ते आपल्या पाठीशी पूर्वीप्रमाणेच ठामपणे राहणार आहेत. मी प्रामाणिकपणे मतदार संघासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. आतून एक व बाहेरून एक बोलण्याची प्रवृत्ती माझी नाही. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांच्याबद्दलही  आपल्याला आदर आहे. त्यांचेही माझ्यावर जीवापाड प्रेम आहे, असेही ते म्हणाले.

मी कोणत्याही वाहनाचे सारथ्य केलेच नाही
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांना घेऊन येणारी लक्झरी बस स्वत: धनंजय महाडिक यांनी चालवून पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप होत आहे; पण मी विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या वाहनाचे सारथ्य केलेच नाही, असे महाडिक यांनी सांगितले. अशा प्रकारचे कोणतेही पुरावे असतील ते द्यावेत, असे आव्हानही महाडिक यांनी केले.