Tue, May 21, 2019 12:08होमपेज › Kolhapur › धनगर समाजाचा एल्गार

धनगर समाजाचा एल्गार

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी रविवारी कोल्हापुरात धनगर समाज क्रांतिकारी संघाच्या वतीने आयोजित मोर्चाद्वारे (रॅली) धनगर समाज बांधवांनी एल्गार केला. ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे...’ अशा विविध घोषणांनी मोर्चाचा मार्ग दुमदुमून गेला. तत्पूर्वी, आयोजित मेळाव्यात धनगरी ढोल, हालगीच्या ठेक्याने चैतन्य आणले. गांधी मैदान येथून दुपारी रॅलीस सुरुवात झाली. आ. राजेश क्षीरसागर, माजी आमदार पी. एन. पाटील, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासो गाठ, अहिल्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव शेंडगे, धनगर समाज क्रांतिकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष विलासराव वाघमोडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

प्रलंबित मागण्यांसाठी रविवारी धनगर समाज क्रांतिकारी संघाच्या वतीने रॅली व मेळाव्याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील शेकडो समाज बांधवांनी या मेळाव्यास हजेरी लावली होती. युवक-युवतींचा मोठा सहभाग होता. दुपारी एक वाजल्यापासून कार्यकर्ते गांधी मैदानात गर्दीने येत होते. डोक्यावर पिवळ्या रंगाच्या टोप्या आणि हातात पिवळे ध्वज यासह समाजप्रबोधन करणारे फलक अनेकांच्या हातात होते. फुलांनी सजविलेल्या दोन उघड्या जीपसह अनेक चारचाकी वाहने रॅलीत सहभागी होती. आकर्षक वेशभूषा धारण करून एक कार्यकर्ता मल्हार रूपात घोड्यावरून सहभागी झाला होता. तर महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या.     
संयोजन समितीने मोर्चात सहभागींसाठी नाष्ट्याची सोय केली होती. उद्घाटनानंतर रॅलीस सुरुवात झाली. धनगरी नृत्य, ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’, हालगी-लेझमीचा ठेका धरत रॅली खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, महापालिका चौक, माळकर तिकटी, सीपीआर चौकमार्गे दसरा चौकात आली. जागोजागी उत्साही कार्यकर्त्यांनी भंडार्‍याची उधळण केली. जिल्हाध्यक्ष कृष्णात शेळके, प्रा. राजेंद्र कोळेकर, दीपक शेळके, बाळासो मोठे, बाबुराव बोडके, विजय देसाई यांच्यासह आबालवृद्ध सहभागी झाले होते. 

दरम्यान, दुपारी आ. अमल महाडिक यांनी गांधी मैदानात मोर्चेेकर्‍यांची भेट घेऊन मागण्यांना पाठिंबा दर्शविला. 

लक्षवेधी फलक 

धनगर समाजाचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी रॅली व मेळावा झाला खरा; पण या रॅलीतील समाज प्रबोधन करणार्‍या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये ‘मुलगा मुलगी भेद नको...मुलगी झाली खेद नको’, ‘प्लास्टिकचा वापर टाळा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘झाडे लावा... झाडे जगवा’, ‘पाणी वाचवा’, ‘गिरवू अक्षर... होऊ साक्षर’, ‘पर्यावरण वाचवा... देश घडवा’ असे एकापेक्षा एक हटके समाज प्रबोधन करणारे फलक घेऊन समाज बांधव सहभागी झाले होते. 

लेझीम पथकाने लक्ष वेधले 

रॅलीत कोगील बुद्रुक येथील छोट्या मुलांचे व मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते. हालगीच्या ठेक्यावर बहारदार चाली धरून उपस्थितांचे लक्ष वेधून त्यांनी वाहवा मिळविली. तर जिल्ह्यातील धनगर समाजबांधवानीदेखील ढोलाच्या तालावर रॅली मोर्चा दणाणून सोडला. 

समाज प्रबोधन करणारे फलक घेऊन युवतींचा सहभाग ‘दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे’ (2014), ‘धूम्रपान, मद्यपान, आयुष्याची धूळदान’, ‘काठीनं घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी मोर्चाला येऊ द्या की...’, ‘ऊठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो...’ असे वैविध्यपूर्ण आणि समाज प्रबोधन करणारे फलक घेऊन युवती मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्या होत्या. 

महापुरुषांचे लक्षवेधी फलक 

रॅलीत टेम्पोवर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, सुभेदार मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे लक्षवेधी फलक रॅलीत होते.
मेळाव्यातील ठराव 

1) धनगर समाजाची अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाची नोंद घटनेत आहे, त्याची अंमलबजावी करावी. 
2) धनगर वाड्या-वस्त्यांवर आवश्यक किमान मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, दवाखाना यांची पूर्तता करावी.
3) पारंपरिक शेळी-मेंढी पालन-पोषण करण्यार्‍यांना संरक्षण देऊन उद्योगाला गती देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत शासनाने पतपुरवठा करावा. 
4) डंगे धनगरांच्या पिढ्यान्पिढ्या कसणार्‍या व वहिवाट असणार्‍या वनजमिनी नावांवर होण्यसाठी महसूल विभागाकडून संरक्षण मिळावे.
5) क्रिमिलेअरची अट तत्काळ काढून टाकावी.

आरक्षणासाठी सरकार सकारात्मक 

धनगर आरक्षणप्रश्‍नी सरकार सकारात्मक असून योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेचा सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल भक्कम पुराव्यानिशी लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

काँग्रेसने आजवर समाजाची दिशाभूल केली असली, तरी आमचे शब्द पाळणारे सरकार आहे, आम्ही झोपेत दिलेलाही शब्दही पाळतो, अशी टिपणीही ना. पाटील यांनी केली. दरम्यान, व्यासपीठावरच आ. सतेज पाटील यांनी भंडारा घ्या आणि आरक्षणाची तारीख सांगा, असे आव्हान पालकमंत्र्यांना दिले. 

आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हा धनगर क्रांतिकारी संघाच्या वतीने दसरा चौकात धनगर समाज आरक्षण मेळावा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आरक्षणाच्या अंतिम लढ्याचे रणशिंग ऐतिहासिक दसरा चौकातून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या साक्षीने फुंकण्यात आले. यावेळी धनगर समाजातर्फे पाच मागण्यांचे ठराव 

निवेदन स्वरूपात पालकमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी महापौर स्वाती यवलुजे, आ. राजेश क्षीरसागर,     आ. सतेज पाटील, क्रांतिकारी संघाचे विलास वाघमोडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

धनगर समाजाविषयी आस्था असल्यानेच नाशिक त्र्यंबकेश्‍वरचा दौरा अर्ध्यावर सोडून कोल्हापुरात आल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. या आस्थेमुळेच भाजपने राज्यात दोन कॅबिनेट आणि राज्यसभेतील एक खासदारकी अशा समाजातील तिघांना प्रतिनिधित्व दिले आहे. काँग्रेसने मात्र समाजाची कायम दिशाभूलच केली. आरक्षणाचा ठराव पाठवला; पण व्यवस्थित आराखडा दिला नाही. तो केंद्राकडून परत आला. पुन्हा असे होऊ नये, याची आम्ही दक्षता घेत आहोत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेकडे संशोधनाची जबाबदारी सोपवली असून त्यांचा आलेला अहवालही सकारात्मकच आहे. स्वत: मुख्यमंत्री यासंदर्भात पाठपुरावा करत आहेत. यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. भाजपला शब्द पाळता येतो. हे टोल आणि एलबीटी घालवून दाखवून दिले आहे. मराठा समाजालाही सवलती देऊन शब्द पाळला आहे. भाजप हे शब्द पाळणारे सरकार आहे, त्यामुळे झोपेत दिलेला शब्दही आम्ही पाळतो, अशी टिपणी ना. पाटील यांनी केली. 

आ. सतेज पाटील यांनी धनगर आरक्षणाच्या लढ्याची सुरुवात कोल्हापूरच्या शाहूंच्या भूमीतून केल्याबद्दल आभार व्यक्त करून या लढ्याच्या माध्यमातून मंत्रालयातील खुर्च्या हलवा, असे आवाहन केले. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्येच आरक्षण देऊ, असे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तीन वर्षांपासून नुसतीच फसवणूक केली आहे. आता परत एकदा येऊन निर्णय घेतो म्हणून पालकमंत्री सांगतात, यावर टीका करताना, अरे परत येऊन सांगताय कशाला, निर्णय घेण्याची संधी दिली आहे, तर निर्णय घ्या आणि आरक्षण पदरात टाका, असे आव्हान आ. पाटील यांनी दिले. काँग्रेसने काय केले, यापेक्षा तुम्ही का दिले नाही, ते आधी सांगा. आम्हाला न्यायालयीन अडचणी आल्या; पण आम्ही कधी राजकारण केले नाही, समाजाच्या मागे ठामपणे उभे राहिलो. तुमच्यात हिंमत असेल तर भंडारा हातात घ्या आणि आताच आरक्षण कधी देणार त्याची तारीख जाहीर करून टाका, असे खुले आव्हान आ. पाटील यांनी दिले. दोन वर्षांपासून नुसते सर्व्हेचे ऐकतोय. टाटा संस्था मुंबईत बसून की अमेरिकेत जाऊन सर्वेक्षण करत आहे, हेच कळेनासे झाले आहे. सरकारने ठरवले तर 24 तास सुद्धा लागणार नाहीत; पण ती इच्छाशक्ती सध्याच्या सरकारकडे नाही, अशी टीकाही आ. पाटील यांनी केली. 
आ. राजेश क्षीरसागर यांनी, 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनगर आरक्षणाबाबतीत समाजाच्या भावना विधानभवनात जोरदारपणे मांडू, असे आश्‍वासन दिले. लोकसभेतही शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी प्रश्‍न मांडावा, यासाठी त्यांना विनंती करणार असल्याचेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले. सत्तेत असलेल्या भाजप, सेना, रिपाइं, धनगर या घटकपक्षांच्या झालेल्या महायुतीचे पत्र हाती सापडले असून यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना महायुतीची आठवण करून  देणार असल्याचे सूचक वक्तव्य आ. क्षीरसागर यांनी केले.
दादा तुम्ही कंसातले मुख्यमंत्री
दादा तुम्ही कंसातले मुख्यमंत्री आहात, तुमचा शब्द कोणी डावलणार नाही. तुम्ही आमच्या व्यथा जाणता, तुम्हीच न्याय देऊ शकता. आम्हाला आरक्षणाच्या सवलती देऊन आमच्या पोराबाळांना शिकू द्या, असे आवाहन धनगर क्रांती महासंघाचे अध्यक्ष विलास वाघमोडे यांनी केले. आपल्या भाषणात समाजाची शैक्षणिक, सामाजिक प्रगती रोखली गेल्यानेच आरक्षणाची गरज व्यक्त करताना आदिवासीचे काढून देऊ नका; पण जे घटनेने दिले आहे, ते तरी द्या, अशी मागणी केली. 

पांचमचे पंचम मग धनगडचे धनगर का नाही?

आरक्षणासाठी पांचमचे पंचम अशी दुरुस्ती घटनेत केली जाते; पण गेल्या 65 वर्षांपासून धनगडऐवजी धनगर ही दुरुस्ती का होत नाही, असा सवाल धनगर क्रांती संघाचे कृष्णाजी शेळके यांनी केला. धनगड ही जातच अस्तित्वात नसतानाही त्याला लाभ दिल्याचे कसे काय सांगितले जाते. र ऐवजी ड या एका शब्दाने समाजाचे मोठे नुकसान केले असून एसटीच्या सवलतीपासून वंचित ठेवले आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी राज्यसभेत ताकद वापरा, असे आवाहन शेळके यांनी केले.