Fri, Apr 26, 2019 02:14होमपेज › Kolhapur › ढोल वाजवून मंत्रालय हादरवणार

ढोल वाजवून मंत्रालय हादरवणार

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:25AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

येत्या 22 मे रोजी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. धनगरी ढोल गर्जनेतून मंत्रालयाबरोबरच संसदही हादरवून सोडू. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला करायचे हे धनगर समाजच ठरवेल, असे प्रतिपादन धनगर समाजाचे राज्य अध्यक्ष माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी केले. 

22 मे रोजी काढण्यात येणार्‍या मोर्चाच्या नियोजनासंदर्भातील जयसिंगपूर येथील 13 पंथी जैन भवनमध्ये बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. शेंडगे म्हणाले, निवडणुकीपूर्वी बारामतीमध्ये जे आंदोलन झाले, त्यावेळी भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे सरकार आल्यास कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, साडेतीन वर्षे उलटून गेली मात्र अद्यापही आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला नाही. त्यामुळे या सरकारला जाग आणण्यासाठी धनगरी ढोल व कैताळांच्या गर्जनेत मंत्रालयासमोर निनाद करण्यात येणार आहे. यातून सरकारच्या कानठळ्या बसतील. मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे अडीच हजार धनगरी ढोल सहभागी हाणार असल्याचेही ते म्हणाले.

धनगर समाजोन्नती मंडळाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अशोकराव कोळेकर म्हणाले, धनगर समाजाच्या प्रश्‍नासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची वेळ आली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या पाठिशी सर्वांनी राहून समाजाला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. शिरोळ तालुक्यातून 600 ढोल सहभागी होतील अशी माहिती गजानन करे यांनी दिली.  मोर्चामध्ये सर्वांनी खांद्यावर घोंगडे व डोक्याला फेटा बांधून सहभागी व्हावे असे आवाहन कल्लाप्पा गावडे यांनी केले. यावेळी रवी पाटील, संदीप कारंडे, शंकर पुजारी, सौ.शेंडगे यांची भाषणे झाली. शिरोळा तालुका अध्यक्ष सोमा गावडे, आण्णाप्पा अवघडी यांच्यासह  शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.