Fri, Apr 19, 2019 12:46होमपेज › Kolhapur › सरकारला जागा दाखवून द्या(Video)

सरकारला जागा दाखवून द्या(Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

अच्छे दिन येणार म्हणून लोकांची फसवणूक केली. कोणताही घटक समाधानी नाही. सरकार कोणत्याही प्रश्‍नावर बोलायला तयार नाही, केवळ लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत. अशा सरकारला त्यांची जागा दाखवा, असा घणाघाती हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी कोल्हापुरात केला. 

चौथ्या टप्प्यातील पश्‍चिम महाराष्ट्रातील या आंदोलनाला आज कोल्हापुरातून प्रारंभ झाला. यावेळी दसरा चौकात झालेल्या जाहीर सभेत केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोणतीही निवडणूक नसताना हे आंदोलन होत आहे, हे कोणाला बदनाम करावे या उद्देशाने नाही. हे आंदोलन केवळ जनता सुखी व्हावी, याकरिता आहे. नाकर्ते सरकार बाजूला करण्यासाठी आहे. 1947 पासून या देशात अनेक लाटा आल्या, कधी जनता पक्षाचे सरकार आले, कधी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, कधी व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले, कधी अटलबिहारी तर कधी मनमोहन सिंग झाले. अनेक दिग्गजांनी या देशाचे नेतृत्व केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी तर देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा निर्माण केली. नरेंद्र मोदी जनतेला अच्छे दिन येणार, असे सांगत आहेत; पण वस्तुस्थिती काय आहे? तर पूर्वीचेच दिवस चांगले होते, याची आठवण लोकांना येऊ लागली आहे.

शिवपुतळ्याची उंची कमी केली
सर्वत्र अस्वस्थता आहे, असे सांगत पवार म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाचा निर्णय आम्ही घेतला, त्यासाठी जागा निश्‍चित केली; पण या सरकारने शिवछत्रपतींच्या पुतळ्याची उंचीच कमी केली आणि फ्लोअरची उंची वाढवली. याबाबत सरकार सभागृहात उत्तर देऊ शकले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन केले? पुढे काम का केले जात नाही? कोणत्या निवडणुकीची वाट पाहताय? बुलेट ट्रेन सुरू करणार तर म्हणे मुंबई-हमदाबाद? कशासाठी आणि कोणासाठी? प्रथम आहे त्या ट्रेन चांगल्या करा, त्यातील सुविधा तर वाढवा; पण कोणाला तरी बरे वाटावे म्हणून सव्वा लाख कोटीचा निधी द्यायचा? ‘ना मै खाऊँगा, ना दुसरे को खाने दुँगा’ असे म्हणायचे आणि यांच्या जवळचे बँका लुटून परदेशात पळून गेले. डावोसमध्ये नीरव मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदीसमवेत फोटोत झळकतोय. विजय मल्ल्या तिकडे मस्त मजा करतोय आणि इकडे जनतेच्या कर्जासाठी लिलाव लावले जात आहेत, हेच का अच्छे दिन आहेत, असा सवालही त्यांनी केला.

संविधान बदलण्याची भाषा ही कसली मस्ती?
सरकार संविधान बदलण्याची भाषा करते, त्यांचा मंत्री ही भूमिका मांडतो, ही कसली मस्ती आहे, ही कशाची धुंदी आहे, असा सवाल करत पवार म्हणाले, कोणताही प्रश्‍न अंगलट येणार असेल तर यांनी नवे  मुद्दे काढायचे, कोरेगाव-भीमामध्ये का बंदोबस्त ठेवला नाही, आपण दहा वर्षे पालकमंत्री होतो, असे कधी घडू दिले नाही. का दोन समाजात तेढ निर्माण केली, का दोन समाजात अंतर पाडले, स्वत:ची राजकीय पोळी भाजायला? आजही देशात जातीय तणाव निर्माण होत आहेत, निष्पापांचे बळी जात आहेत, तेव्हा कुठे जाते 56 इंचाची छाती? आमचा एक जवान शहीद झाला तर पाकिस्तानचे पाच जणांना मारू म्हणणारे आमचे पंतप्रधान पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला मिठ्ठी मारायला जातात. अरे मिठ्ठ्या कसल्या मारता, गोळ्या घातल्या पाहिजेत. याबद्दल काही बोलत नाहीत. केवळ घोड्यावर बसला म्हणून दलित तरुणाची गुजरातमध्ये हत्या होते. महिला अधिकार्‍याचा खून करून, तिच्या शरीराचे तुकडे करणार्‍या कुरूंदकरसारख्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचे प्रकरण दाबून ठेवले जाते. पंढरपुरात भरदिवसा मुडदा पाडला जातो. कॉ. पानसरे, डॉ.दाभोलकर यांचे मारेकरी अजून सापडत नाहीत. सांगलीत अनिकेत कोथळेचा खून करून मृतदेह आंबोलीत पोलिसच नेऊन जाळतात. या सर्वांचा विचार केला पाहिजे. पुढच्या पिढीचे आयुष्य अंधारमय होऊ नये, त्यांना प्रकाश मिळावा म्हणून तुम्ही आता विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारने राज्याला बरबाद केले, कंगाल केले, कर्जबारी केले, असा आरोप करत पवार म्हणाले, आम्ही सत्ता सोडली त्यावेळी राज्यावर पावणेतीन लाख कोटींचे कर्ज होते, गेल्या 54 वर्षांतील हे कर्ज आहे. आता या सरकारला तीन वर्षे झाली आहेत, निवडणुकीपर्यंत राज्याचे कर्ज पाच लाख कोटींपर्यंत जाईल, म्हणजे केवळ पाच वर्षांत सव्वा दोन लाख कोटींचे कर्ज सरकारने आपल्या डोक्यावर लादले आहे. यूपीए काळात एक  टक्के लोकांकडे एकूण संपत्तीच्या 49 टक्के संपत्ती होती. आता याच एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे, हे अच्छे दिन आहेत का? राज्याचे कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर-पाटील 78 कोटींची थकबाकी 2015 मध्ये सेटलमेंट करून 41 कोटी भरण्यास तयार होते, त्यांना या सरकारने 25 कोटी भरायला लावून 53 कोटी माफ केले. मग सर्वसामान्य थकबाकीदाराला हा न्याय का नाही? वीजबिल वेळेत भरणारा कोल्हापूर जिल्हा, त्याला वीज बिलासाठी आंदोलन करावे लागते, जे बुडवतात त्यांना सवलत आणि जे प्रामाणिक वागतात त्यांची अडवणूक, असा हा सरकारचा कारभार आहे.

कोल्हापूरच्या स्टँडिंगमध्ये अंडरस्टँडिंग!
कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते फुटली. भाजपचा अध्यक्ष झाला. कारवाई होणार हे माहीत असूनही मते फुटली म्हणजे काही तरी तोडपाणी झालेच असेल, ही घोडेबाजाराची सवय लावली कोणी? स्टँडिंगमध्येच अंडरस्टँडिंग झाले, असे सांगत पवार म्हणाले, औरंगाबाद कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपने पाच कोटीची ऑफर दिल्याचे सांगितले होते, तसे 30 आमदार फोडणार होते. म्हणजे 150 कोटी रुपये देणार. राज ठाकरे यांचे सहा नगरसेवक फुटले, त्यांनाही प्रत्येकी पाच कोटी दिल्याचे, त्यांनी सांगितले. हे पैसे कोठून आले, असा सवालही त्यांनी केला.

कोल्हापूरसाठी सरकारने काय केले?
पश्‍चिम महाराष्ट्रातील आंदोलनाची सुरुवात राजर्षी शाहूंच्या या कोल्हापूर नगरीत करत आहोत. या नगरीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. थेट पाईपलाईन, शाहू जन्मस्थळ विकास, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग मैदान, अंबाबाई तीर्थक्षेत्र, जोतिबा तीर्थक्षेत्र विकास, शिवाजी विद्यापीठासाठी निधी असा कितीतरी निधी दिला. या सरकारने कोल्हापूरला काय दिले, आठ लाख कोटींची गुंतवणूक सांगतात, त्यातील किती गुंतवणूक कोल्हापुरात आली, किती मुलांना नोकर्‍या लागल्या, किती शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली, असे सवाल करत टोलबाबतही आपण बोललो होतो, त्याला स्थगिती आम्ही दिली होती. आमचे सरकार आले तर टोलमाफीचीही भूमिका आम्ही घेतली होती, असेही पवार यांनी सांगितले.

दर गगनाला भिडले
देशात 2014 ला 60 रुपये किलो डाळ, 50 रुपये लिटर पेट्रोल, 375 रुपये गॅस सिलिंडर रुपयांनी मिळत असताना भाजपवाले महागाई वाढल्याचे दाखवित होते. भाजप सरकारच्या काळात पेट्रोल, सिलिंडर, डाळीचे दर गगनाला भिडले तरी लोकांना महागाई वाटत नाही. भाजपने मोठे इंजेक्शन दिले ते टोचत कसे नाही, हीच कला कळली नसल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.

 यांचे मित्र कोण?
भाजप सरकारला ऑनलाईन व मोबाईल अ‍ॅपचा नाद आहे. सरकारच्या महामित्र अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या सहीचे सर्टिफिकेट घरपोच दिले जाते. यात अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इबाहिम यांची नावे बाहेर आली आहेत, यावरून यांचे कोण मित्र आहेत हे जगासमोर आले आहे. हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही मुंडे म्हणाले. 

 उंदरांतही भ्रष्टाचार
हे सरकारच भ्रष्टाचारी आहे. चिक्कीत भ्रष्टाचार, आदिवासी साहित्यात भ्रष्टाचार, महापुरुषांच्या फोटो खरेदीतही भ्रष्टाचार, अग्निशमन दलाच्या जागेवर मंत्र्यांचा बंगला, काय नाही सापडले म्हणून आता उंदरांतही भ्रष्टाचार केला, असे हे सरकार असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

 अरे कसला वादा.. आधी आमदार निवडून आणा!
पवार बोलण्यासाठी उभे राहिले असता एका कार्यकर्त्याने ‘एकच वादा...’ अशी घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्याला मध्येच थांबवत, ‘अरे कसला वादा..’ आदी जिल्ह्यातील सगळे आमदार निवडून आणा, अशा शब्दांत त्याला फटकारले.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने ‘बहोत हो गई मँहगाई की मार, अबकी बार मोदी सरकार’, अशी जाहिरात केली होती. आज महागाई वाढली असताना कोणी बोलत नसल्याचे सांगत मुंडे यांनी अचानक ‘घ्या गोंदून’, असे म्हटल्यावर उपस्थितांनी हास्यकल्लोळ केला.

Tags : kolhapur, dhananjay munde, bjp government, ncp halalbol yatra


  •