कोल्हापूर : प्रतिनिधी
आमदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि जिल्ह्याचे नेते असून त्यांच्यासमोर आपण छोटा माणूस असल्याचे स्पष्टीकरण खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केले. प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यासाठी रक्ताचे पाणी करणार असल्याचे आ. मुश्रीफ यांनी जाहीर केल्याकडे लक्ष वेधले असता खा. महाडिक यांनी हे विवेचन केले.
खा. महाडिक म्हणाले, की येत्या लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर मतदारसंघातून खासदार कोण होणार हे त्यांनाच विचारलेले बरे. मी खासदार झाल्यानंतर मतदारांकडून असणार्या अपेक्षा आणि माझे कर्तृत्व मी सिद्ध केले आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत कोणाला खासदार करायचे ते मतदारच ठरवतील. आ. मुश्रीफ यांनी काय आणि कसे वक्तव्य केले त्याबाबत आपल्याला कल्पना नाही. काही जणांची वैयक्तिक मते असतात. त्याबाबत आपण बोलणे योग्य होत नाही.
आ. मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि जिल्ह्याचेही मोठे नेते आहेत. त्यांच्यासमोर आपण खूपच छोटा माणूस आहे. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य होणार नाही. कोणाला खासदार करायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. मतदारच काय ते ठरवतील, असेही खा. महाडिक यांनी सांगितले. भीमा कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.