Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Kolhapur › देवर्डेेत टस्करकडून शेती अवजारांचे नुकसान

देवर्डेेत टस्करकडून शेती अवजारांचे नुकसान

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 12:04AMआजरा : वार्ताहर

गेल्या चार दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्याकडे गेलेल्या टस्करचे आजरा तालुक्याच्या पश्‍चिम भागात आगमन झाले असून, रात्री देवर्डे येथे टस्करने ऊस पिकाच्या नुकसानीबरोबरच शेत नांगरणीकरिता गेलेला पॉवरट्रीलर उचलून टाकून मोठे नुकसान केले. मान्सूनपूर्व पावसाने अंतिम टप्प्यात आलेल्या मशागती व नुकत्याच सुरू झालेल्या पेरणी कामांनी गती घेतली असताना टस्करच्या पुनरागमाने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.

तालुक्यातील चार ते पाच दिवसांपासून कर्पेवाडी, वेळवट्टी, हाळोली, मसोली व देवर्डे परिसरात टस्कर हैदोस घालत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. मेसकाठ्या, फणस, नारळांची झाडे, केळी यासह उसाचेही मोठे नुकसान करण्याबरोबरच शेतातील पाण्याची टाकीही फोडून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. रात्री तर आक्रमक टस्करने देवर्डे येथील महादेव दत्ताजी मांग यांचा पॉवरट्रीलर उचलून टाकून मोडतोड केली आहे. महादेव मांग हे शामराव गुंडू चाळके यांच्या कामत नावाच्या शेतामध्ये नांगरणीकरिता पॉवरट्रेलर घेऊन गेले होते. दरम्यान, टस्करने रात्रीच्यावेळी शेतामध्ये असलेला पॉवरट्रीलर उचलून टाकल्याने डिझेलच्या टाकीसह अन्य मोठी मोडतोड झाली असून मांग यांचे अंदाजे 30 हजारांचे नुकसान झाले आहे.

तसेच राजाराम जानबा मळेकर यांच्या ऊस पिकामध्येही रात्री टस्करने धुडगूस घातला व उसाची नासाडी केली. टस्करच्या या वावरामुळे शेतामध्ये काम करण्यासाठी जाण्याकरिता अडचणी निर्माण होणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी वनरक्षक एस. एस. इंगळे, वनमजूर रमेश पाटील, शिवाजी मटकर यांनी करून पंचनामा असून टस्करचा वावर असलेल्या परिसरात शेतकर्‍यांसह नागरिकांनी जाऊ नये, असे वनविभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.