Tue, Apr 23, 2019 06:24होमपेज › Kolhapur › भाविकांचे जथ्थे डोंगराच्या वाटेवर

भाविकांचे जथ्थे डोंगराच्या वाटेवर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी असला, तरी गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्ट्या असल्याने आबालवृद्धांसह  भाविक बुधवारपासूनच हालगीच्या निनादात, जोतिबाचा जयघोष करत डोंगराकडे रवाना होऊ लागले आहेत. दरम्यान, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन एस.टी.च्या कोल्हापूर विभागाने बुधवारी सायंकाळपासून जादा बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे.
श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची यात्रा सुरू झाली असून, शनिवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. दोन दिवसांपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांतून त्याचबरोबर बेळगाव, चिक्‍कोडी, रायबाग यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भाविक मानाच्या सासनकाठींसह जोतिबा डोंगराकडे रवाना होऊ लागले आहेत. खासगी वाहनांतून जाणार्‍या भाविकांबरोबरच पायी चालत जाणार्‍या भाविकांची संख्याही मोठी आहे.

यात्रेसाठी जादा बसेस

दरम्यान, एस.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या वतीने गुरुवारपासून खास यात्रेसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत, त्यासाठी पंचगंगा नदीघाटावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या दरम्यान एस.टी.चे विभाग नियंत्रक एस. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते या बसस्थानकाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास एस.टी.च्या सुरक्षा व दक्षता विभागाचे अधिकारी सुधीर भातकांडे, आगार व्यवस्थापक सुनील जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे आदी उपस्थित राहणार आहेत. 

भाविकांच्या संख्येत वाढ

जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस हा 31 मार्च आहे; पण महावीर जयंती, गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार अशा सलग चार दिवस शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्ट्या आहेत. यामुळे मंगळवारपेक्षा बुधवारी पंचगंगा नदीघाटावर आलेल्या भाविकांची संख्या वाढलेली दिसत होती. उद्या गुरुवारपासून भाविकांच्या संख्येत अधिक वाढ होणार आहे.
हे लक्षात घेऊन महापालिकेने पंचगंगा नदी घाटावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय केली आहे. उद्यापासून आरोग्य पथकासह अन्य सुविधा तैणात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, devotees, moving, towards, Jyotiba Dongar


  •