Thu, Jul 16, 2020 00:24होमपेज › Kolhapur › डंख छोटा...धोका मोठा

डंख छोटा...धोका मोठा

Published On: Jun 18 2018 1:16AM | Last Updated: Jun 18 2018 12:15AMकोल्हापूर : विजय पाटील 

शिवाबापूंचा ताप दोन-चार दिवस कमी-जास्त होत होता. डोळ्याची खोबणी आणि सांध्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. जोडीला डोकेदुखी आणि अपचन सुरू होते. डॉक्टरांनी निदान करण्यासाठी त्यांना काही चाचण्या करण्यास सांगितले. शिवाबापूंना डेंग्यू असल्याचे वेळीच लक्षात आले. उपचार केल्यानंतर ते पाचव्या दिवशी पुन्हा खडखडीत होऊन कामात व्यस्त झाले. रामाण्णांना लक्षणे शिवाबापूंसारखीच वरवर दिसत होती, पण सांधेदुखी असह्य होती. त्यांचे उपचारात चिकुन गुनियाचे निदान झाले. आता ही दोघे दिसेल त्याला सांगताहेत. बाबांनो, एका डासाने आमचा पाच-पंचवीस हजारांचा खिसा मारलाय. त्यामुळे प्रत्येकाने डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करा. नाहीतर तुमचाही खिसा एखादा डास मारणार, मग बसा हात चोळत.

शहर व उपनगरातील ही प्रातिनिधिक पण बोलकी उदाहरणे आहेत. जवाहरनगर, कदमवाडी, भोसलेवाडी, दौलतनगर, संभाजीनगर परिसर आदी भागात डेंग्यू आणि डेंग्यूसद‍ृश रोगांची लक्षणे असणार्‍या नागरीकांची संख्या वाढू लागली आहे.  विजयनगर, शहाजी वसाहत या परिसरात तर रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे.

महापालिकेची आरोग्य यंत्रणा अद्यापही कागदावर काम करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसते. डेंग्यूच्या रोगाने शहरभर हातपाय पसरण्या सुरुवात केली असताना चिकुन गुनियाचे रुग्णही वाढू लागले आहेत. 

डेंग्यू किंवा चिकुन गुनियाची चाचणी व त्यानंतर उपचार यासाठी पेशंटना मोठा खर्च येतो. खर्चासह घरात विश्रांती घ्यावी लागत असल्याने नोकरी-व्यवसायाच्या उत्पन्‍नालाही चाट बसू शकते. 

...हे आहे वास्तव 

विजयनगर, शहाजीनगर या परिसरात घरटी एक किंवा दोन पेशंट आहेत; पण प्रशासनाकडून म्हणावे तसे सहकार्य केले जात नसल्याचे उपमहापौर महेश सावंत यांनी सांगितले. दुसर्‍या बाजूला दौलतनगरमध्ये एका गल्लीत पंधरा-वीस पेशंट डेंग्यूसद‍ृश आजाराचे असून ते उपचार घेत आहेत. 

   आपण घ्यायला हवी दक्षता

डेंग्यूचा डास हा शुद्ध पाण्यात वाढतो आणि फोफावतो हे आता सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनीही घरातील फ्रिजच्या मागील बाजूस ट्रेमधील साचणारे पाणी दररोज टाकून दिले पाहिजे. पाणी साठवण्याच्या जागा बंदीस्त केल्या पाहिजेत. आसपासच्या परिसरात नारळाच्या करवंटी, रिकाम्या टायरीत साचलेले पाणी दिसले असेल तर त्याचा त्वरित निपटारा करायला हवा. कारण या इडिस इजिप्ती डासाच्या प्रजातींची उत्पत्ती या जागांतून होते. अगदी घरातील कुंडीत किंवा बाथरूममध्ये रोजच्या वापरासाठी पाण्याचा साठा असेल तर आपण डेंग्यूचा डासाचा बॉम्ब घरात ठेवताय हे लक्षात घ्यायला हवे. कारण हा डास आसपासच चावा घेतो. त्यामुळे पाण्याच्या साठ्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आता तर पाऊस सुरू झाल्याने याबाबत अधिकच दक्ष राहण्याची गरज आहे. 

    एक डास करतोय पाच ते पंचवीस हजारांचा खिसा रिकामा
    डेंग्यूने शहरासह उपनगरांतही हातपाय पसरले
    चिकुन गुनियाचे रुग्ण वाढताहेत
    डासांची उत्पत्ती नष्ट करणे हा खात्रीशीर उपाय
    मंडळे, सामाजिक संस्थांनी  पुढाकार घ्यावा

...अशी  घ्यावी काळजी

संपूर्ण विश्रांती, भरपूर पाणी पिणे, प्लेटलेटस्ची संख्या तपासत रहावे.