होमपेज › Kolhapur › नगरसेविकेच्या पतीला डेंग्यू; कोल्हापुरात 26 डेंग्यूसदृश रुग्ण

नगरसेविकेच्या पतीला डेंग्यू; कोल्हापुरात 26 डेंग्यूसदृश रुग्ण

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 12:32AMकोल्हापूर ः प्रतिनिधी - 

कोल्हापूर शहरातील 15 जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा नव्याने 26 डेंग्यूसदृश रुग्ण आढळले. तसेच नगरसेविका सौ. उमा बनछोडे यांचे पती शिवानंद यांना डेंग्यू झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात डेंग्यूचा फैलाव सुरूच असल्याचे स्पष्ट होते. परिणामी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. उपमहापौर महेश सावंत यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. तसेच नगरसेविका सौ. वहिदा सौदागर यांच्यासह त्यांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पाणी साठून राहिलेल्या 47 इमारत मालकांना महापालिकेने कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. 

210 ठिकाणी डासांच्या अळ्या...

शहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील कनाननगर, जुना बुधवार पेठ, महाडिक माळ, जवाहरनगर, देवकर पाणंद, शहाजी वसाहत इत्यादी ठिकाणी आरोग्य विभाग, पवडी विभाग, नागरी कुटु्ंब कल्याण केंद्र(दवाखाना) इत्यादी विभागांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्यात आली. मोहीमे अंतर्गत 2974 कुटुंबांचे सर्वेक्षण करणेत आले. त्यापैकी 210 कुटुंबाकडील साचलेल्या पाण्यामध्ये डास आळी आढळुन आली. 26 ठिकाणी खरमाती उठाव करण्यात आली. 49 पाण्याचे डबके मुजविण्यात आली. शहरात डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यासाठी 250 प्रमुख ठिकाणी जनजागृतीचे होर्डिंग्ज लावण्यात आले. दरम्यान, महापौर सौ. शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी संयुक्तपणे शहाजी वसाहत येथे पाहणी केली. यावेळी उपमहापौर महेश सावंत, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर व कर्मचारी आदी उपस्थित होते. मोहीमेत आरोग्य विभागाचे 250 कर्मचारी, पवडी विभागाचे 54, नागरी कुटुंब कल्याणचे 34 कर्मचारी, सर्व आरोग्य निरिक्षक, विभागीय आरोग्य निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक, उपशहर अभियंता, वैद्यकिय अधिकारी सहभागी झाले होते.

दरम्यान, आरोग्यधिकारी डॉ. पाटील यांनी शहरातील खासगी हॉस्पिटल व मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांची गुरूवारी बैठक घेतली. यात डेंग्यूविषयी सविस्तर माहिती महापालिकेला कळवावी. योग्य निदान करा. नागरिकांत भितीचे वातावरण पसरणार नाही याची दक्षता घ्या. अधिकृत लॅबचा अहवाल ग्राह्य माना. डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यास सीपीआरमध्ये पुन्हा चाचणी करून घ्या, अशा सूचना पाटील यांनी केल्या.