Sat, Feb 23, 2019 22:25होमपेज › Kolhapur › डेंग्यूने शहर धास्तावले...डॉक्टर घाबरले...!

डेंग्यूने शहर धास्तावले...डॉक्टर घाबरले...!

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 1:25AM कोल्हापूर : प्रतिनिधी 

शहरातील डेंग्यूच्या वाढत्या फैलावामुळे नागरिक धास्तावले आहेत. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहराच्या कानाकोपर्‍यात डेंग्यूने शिरकाव केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा गतिमान करणे गरजेचे आहे.विशेष बाब म्हणजे, सरकारी डॉक्टरच्या कुटुंंबातील सदस्यावर डेंग्यू डासाने डंख मारला आहे. डेंग्यूच्या साथीमध्ये आबालवृद्धांचा समावेश वाढू लागला आहे. 

निम्म्याहून अधिक कोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा घट्ट  पडला आहे. महापालिकेने 33 प्रभागांत डेंग्यूचा फैलाव झाल्याचे सांगितले आहे; पण शहरातील गल्लीबोळांत डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरवासीय धास्तावले आहेत. शहरातील 14 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासात पुढे आले आहे; पण प्रत्यक्ष हा आकडा मोठा आहे.एका सरकारी दवाखान्यातील नामवंत डॉक्टरच्या कुटुंबीयावर डेंग्यू डासाने डंख मारल्याने आख्खे कुटुंबच भेदरले आहे. डेंग्यूसदृश 280 रुग्ण सर्वेक्षणामध्ये सापडले आहे.त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकी 100 कर्मचार्‍यांची 11 पथके तैनात केली आहेत. 28 जूनपर्यंत प्रत्येक घरात जाऊन कुटुंबीयांचा सर्व्हे करून जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी, धूर फवारणी केली जाणार आहे. 

जेथे पाणी साचून राहते, अशा ठिकाणी पाण्यात गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. ूूूडेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक प्रभागातील तरुण मंडळे, महिला बचत गट, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, घसा दुखणे आदी लक्षणे जाणवू लागल्याने सरकारीसह खासगी दवाखान्यांत रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.