Fri, Feb 22, 2019 07:48होमपेज › Kolhapur › नोटाबंदी हा दोनशे वर्षांतील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा

नोटाबंदी हा दोनशे वर्षांतील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 29 2017 1:22AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

काळा पैसा, बनावट चलन आणि दहशतवादाला आळा घालण्यासाठी नोटा बंदीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, यामुळे विकासाचा वेग कमी झाला आहे. पंतप्रधानांना असा निर्णय जाहीर करण्याचा अधिकारही नाही. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यातील एकही उद्दिष्ट साध्य करू शकले नाहीत. उलट नोटा बंदी म्हणजे दोनशे वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा (इकॉनॉमिक फ्रॉड) आहे, अशी घणाघाती टीका माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. 

क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेनंतर गुरुवारी ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. नोटा बंदीचा निर्णय घेऊन देशातील एकूण चलनापैकी 86 टक्के चलन हे रिझर्व्ह बँकेशी चर्चा न करता रद्द करण्यात आले. हा अविवेकी व बेजबाबदारपणाचा निर्णय होता. 2008 मध्ये जागतिक वित्तीय पेचप्रसंग निर्माण झाला. त्यावेळी भारताचा विकास दर 6.5 टक्के होता. अमेरिकेतील डेबिट व क्रेडिटवर कमिशन आकारणार्‍या कंपन्यांनी भारतावर दबाब आणला यामुळेच नोटा बंदीचा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले. 

अर्थव्यवस्था सावरण्यास किमान दोन वर्षे लागणार
जीएसटीचे विधेयक 2009 पासून प्रलंबित होते. अंमलबजावणी करताना कोणताही विचार न करता घाई केली गेली. सरकारने नोटा बंदी व जीएसटी विधेयके आणली. आता यातून भारतीय अर्थव्यवस्थेस सावरण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. देशातील 50 टक्के पदवीधर, अभियंते बेकार होत आहेत, देशाला ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर घेऊन जाणे धोक्याचे आहे, असेही डॉ. मुणगेकर म्हणाले.

हेगडे यांना बडतर्फ करा

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या राज्यघटना बदलासंदर्भातील वक्‍तव्याचा समाचार घेताना डॉ. मुणगेकर म्हणाले, मंत्री हेगडे यांनी संसदेची दोन्ही सभागृहे व जनतेची माफी मागावी, असा आग्रह विरोधकांना धरला असून त्याला आपला पाठिंबा आहे. देशातील उपेक्षितांना अधिकार देऊ नयेत, अशी संघ परिवाराची भूमिका आहे. देशावर कोणत्याही जाती व समूहाची मालकी नसून सर्वधर्मियांची मालकी आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंत्री हेगडे यांना राज्यघटनेचा अवमान केल्याबद्दल मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे.