होमपेज › Kolhapur › भरधाव घोडागाडी, अन् जीवावर बेतणारी कुरघोडी..!

भरधाव घोडागाडी, अन् जीवावर बेतणारी कुरघोडी..!

Published On: Aug 30 2018 1:18AM | Last Updated: Aug 29 2018 11:57PMभडगाव : एकनाथ पाटील 

अंगावर पडणार्‍या लाठ्या-काठ्या झेलत... अनेक वेळा रक्‍तबंभाळ होत... जीवाच्या अकांताने... प्रचंड वेगाने... फज्जा गाठण्याच्या दिशेने... धावणार्‍या घोडागाडी शर्यतीमध्ये हुलडबाज शर्यती शौकिनांची कुरघोडी घोड्यासह अनेकांच्या जीवावर बेतली जात आहे. 

कागल तालुक्यातील माद्याळ येथील घोडागाडी शर्यतीतील अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून शर्यती शौकिणांचा अतिउत्साहीपणा दिसत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे.

प्राणी छळप्रतिबंध कायदा 1960 नुसार बैलगाडी व घोडागाडी शर्यतीवर काँग्रेस आघाडी शासनाने 2012 मध्ये शर्यतीवर बंदी घातली होती. तर सन 2017 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर या कायद्यात बदल करून विनालाठी विनाकाठी शर्यतीसाठी पुन्हा परवानगी दिली होती. परंतु, पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी कायम राखली असताना देखील ग्रामीण भागात घोडागाडी व बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जाते. परिणामी शर्यती सुरळीत पार पडत नसल्याचे चित्र अनेक भागांत पाहावयास मिळत आहे. 

घोडागाडी स्पर्धेसाठी जेमतेम पाच ते सात गाड्या मैदानात रस्त्यावर असतात. तर या गाडींच्या पाठीमागे आणि पुढे समर्थकांच्या सुसाट शंभरहून आधिक टुव्हीलर गाड्यांचा ताफाच असतो. गाड्यावर ट्रिपल सिटस देखील बसतात पुढे जाणार्‍या-धावणार्‍या घोडागाडीच्या आडवी टुव्हीलर गाडी लावयची पुढे जाण्यापासून रोखण्याचे प्रकार सुरू असतात. तर स्पर्धेत मागे राहणार्‍या घोडा गाडीला पाठीमागून टुव्हीलरने ढकलली जाते. असे समर्थकात सरापणे कुरघोडीचे प्रकार पहावयास मिळतात. अशा प्रकाराचे रूपांतर नंतर मारामारीत झाल्याच्या घटना अनेक भागांत पाहावयास मिळत आहे. 

अशी कुरघोडी अनेकांच्या जीवावर बेतली जाण्याची शक्यता आहे.अशा घटणांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. कायद्याने घोडागाडी व बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे. परंतु, आजही यात्रा जत्रा काळात किंवा हवशा, नवशाच्या वाढदिवसाला अशा शर्यतींचे आयोजन केले जाते. पोलिस प्रशासनाला माहिती असून देखील का दुर्लक्ष होते, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.