Sun, Jan 20, 2019 09:20होमपेज › Kolhapur › बिबट्याच्या तावडीतून वाचले अन् विहिरीत पडले

बिबट्याच्या तावडीतून वाचले अन् विहिरीत पडले

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 11:30PMगारगोटी : प्रतिनिधी

कारिवडे येथे एकाच दिवशी दोनवेळा बिबट्याच्या तावडीतून सुटून, विहिरीत पडूनही चितळास जीवदान मिळाले. 

शनिवारी कारिवडे येथील कुंभारकी या शेतात गणपती भाऊ दिवेकर यांच्या विहिरीत चितळ पडल्याचे जयराम कांबळे, बळवंत कांबळे व युवराज कांबळे यांच्या निदर्शनास आले. या तिघांनी दोराच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी चितळाला बाहेर काढले. बाहेर पडताच क्षणी चितळाने जंगल परिसरात धूम ठोकली. सायंकाळी सहाच्या  सुमारास या शेतकर्‍यांना चितळ गेलेल्या दिशेने बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. शेतकरी घराकडे परतत असताना त्याच कुंभारकी परिसरातील अर्जुन कृष्णा आदित्य यांच्या विहिरीत पुन्हा तेच चितळ बिबट्याच्या भीतीने पडल्याचे शेतकर्‍यांना दिसले. त्यांनी दोराच्या सहाय्याने पुन्हा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, चितळ जखमी झाले होते. त्यांनी वनपाल बी. एस. पाटील यांना याबाबत माहिती दिली. वनक्षेत्रपाल संदेश पाटील, वनरक्षक रणजित पाटील, किरण पाटील आदींचे पथक रात्री कोंडोशी वन परिसरात हत्तीच्या मागावर होते. हे पथक तातडीने कारिवडेत दाखल झाले. रात्रभर  शेतकरी व वन कर्मचारी, ग्रामस्थ यांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल बारा तासांनंतर रविवारी सकाळी सातच्या सुमारास चितळास विहिरी बाहेर काढण्यात यश आले.

जीवदान मिळालेल्या चितळाला वन कर्मचार्‍यांनी पाटगाव, शिवाजीनगर (ता. भुदरगड) येथील जंगलात सुखरूप सोडले.