कोल्हापूर : प्रतिनिधी
नारायण राणे हे कोणत्या पक्षाचे घटक आहेत, याची आपणाला माहिती नाही. या प्रश्नाचे त्यांनीच उत्तर द्यावे, अशी टीका गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे केली. स्वार्थासाठी सतत दलबदलू भूमिका घेणार्या राणेचं गणित मांडणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.
राणे यांच्यावर अनेक पक्षनेत्यांचे उपकार आहेत, असे स्पष्ट करून ते म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री बनविले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, विलासराव देशमुख यांनी त्यांना मानाची पदे दिली; पण नेहमीच स्वार्थी भूमिका घेणारे राणे ज्या ज्या व्यक्तींनी पदे दिली, त्यांच्यावरच ते घसरत असतात. हा प्रकार आम्हाला काही नवा नाही.
राणे यांच्यावर बोलून माझा स्वत:चा वेळ घालविणार नाही, असे स्पष्ट करून येत्या काही दिवसांत आपल्याला स्वच्छ आणि गुन्हेगारमुक्त राजकारणी दिसून येतील, असेही त्यांनी राणेंना उद्देशून टोला लगावला. रायगडमध्ये राणे यांनी राष्ट्रवादीला दिलेल्या पाठिंब्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरात ट्रॅफिकमुळे रुग्णवाहिकेला रस्ता मिळाला नसल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे आपणाला समजले. ही बातमी कानावर येताच दु:ख झाले. ही घटना दुर्दैवी आहे. ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकून एखाद्या निष्पाप जिवाचा बळी जाणे, दुर्दैवी आहे. एखाद्यावेळी जर आपण रुग्णवाहिकेतून रुग्णाला घेऊन जात असाल, तर त्याची वाहतूक शाखा अथवा नजीकच्या पोलिस ठाण्याला माहिती द्यावी. त्या ठिकाणी पोलिस रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून देतील, असेही केसरकर यांनी सांगितले.