Mon, Nov 19, 2018 10:27होमपेज › Kolhapur › निर्णय चांगला; पण अंमलबजावणीत अडचण

निर्णय चांगला; पण अंमलबजावणीत अडचण

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 11:21PMकोल्हापूर : निवास चौगुले

अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी कच्ची साखर उत्पादित करण्याचा निर्णय चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीत अडचणीच जास्त असणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेचे दर प्रतिक्िंवटल 1500 रुपयांच्या आसपास आहेत. त्यावर बँकेची उचल आणि त्यातून एफआरपी द्यायची कशी, हीच सर्वात मोठी अडचण असणार आहे. 

राज्यात गेल्या हंगामात 106 लाख टन साखर उत्पादन झाले. पैकी किमान 75 लाख टन साखर शिल्लक आहे. यावर्षीच्या हंगामातही साखर उत्पादन जादा होईल, असा अंदाज आहे. दुसरीकडे बाजारातील साखरेची मागणी ठप्प आहे. त्यामुुळे अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी येणार्‍या हंगामात पहिल्या दिवसापासूनच थेट कच्ची साखर उत्पादन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या उद्योगाकडून सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेला मागणी चांगली आहे, पण दर प्रतिक्िंवटल 1500 रुपयांच्या आसपास आहे. या दरावर बँकेकडून मिळणारी उचल फारच कमी असणार आहे. त्यातून एफआरपी देता येणार नाही. ही उचल नाही घेतली तरी एफआरपी द्यायची कशातून, हा प्रश्‍न आहेच. यावर्षी एफआरपीत झालेली वाढ देतानाच कारखान्यांसमोर पैशाची मोठी अडचण असणार आहे. त्यामुळे हा व्यवहार फारसा फायद्याचा नसेल. 

गत हंगामात अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यात यावर्षी जादा साखर उत्पादन झाले तर ती ठेवायला जागाही नाही. कच्ची साखर तयार करून ती निर्यात करावी तर त्याला दर चांगला नाही, अशा विचित्र कात्रीत हा उद्योग यावर्षी सापडण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्ये शंभर टक्केकच्ची साखरच तयार केली जाते. ही साखर बाजारात येण्यापूर्वी भारतात कच्च्या साखरेचे निश्‍चित असे धोरण ठरणे आवश्यक आहे.