Tue, Apr 23, 2019 10:21होमपेज › Kolhapur › ‘स्वाभीमानी’ची मागणी; 50 हजार शेतकर्‍यांच्या स्वाक्षरीचे निवेदन

संपूर्ण कर्जमाफी; दीडपट हमीभाव द्या

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:12AMकोल्हापूर: प्रतिनिधी

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतमाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, अशा मागण्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. या मागण्यांचे दोन ठराव संसदेत मांडले जाणार आहेत, त्याला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 50 हजार शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन गुरुवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर विशेष अधिवेशन बोलवावे, त्यात केवळ शेतकर्‍यांच्याच प्रश्‍नांवर चर्चा होऊन निर्णय घ्यावेत अशी मागणी करत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील 193 शेतकर्‍यांच्या संघटना एकत्र आल्या आहेत. त्याच्या वतीने अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने ‘संपूर्ण कर्जमुक्ती’ व ‘उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव’ या दोन मुख्य मागण्यांचे ठराव खासदार राजू शेट्टी संसदेत मांडणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍यांची निवेदने गुरुवारी स्थानिक प्रशासनाला देण्यात आली.

जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’च्या वतीने 50 हजार शेतकर्‍यांच्या स्वाक्षरीचे निवेदन आणि 500 ग्रामपंचयातीचे ठराव जमा करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी ‘स्वाभिमानी’च्या नागाळा पार्क येथील कार्यालयापासून पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. केंद्र व राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकर्‍याला संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे देशाच्या इतिहासातील काळेकुट्ट पानच आहे. कृषी व्यवस्थेची शोकांतिका मानवतेलाच शरम आणणारी आहे. पीक जगवण्यासाठी कर्ज काढायचे, किमान हमीभाव न मिळाल्याने पिकवलेला माल कवडीमोलाने विकायचा, पुन्हा परिस्थितीमुळे कर्ज काढायचे, असे आणखी कर्जबाजारीच होत जायचे असेच दृष्टचक्र या देशात शेतकर्‍यांच्या नशिबी आले आहे. त्यातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे न थांबणारे चक्र सुरू झाले आहे. ही स्थिती बदलायची असेल तर संपूर्ण कर्जमाफी दिलीच पाहिजे, त्यासोबत शेतमालाला दीडपट हमीभाव दिला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हमीभाव दिला तरच शेती व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणारी जनता , त्यांच्याशी संबधित सर्व उद्योग टिकतील आणि या देशाला पुन्हा वैभव प्राप्त करून देतील असेही यावेळी सांगण्यात आले.

‘स्वाभिमानी’चे भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, रमेश भोजकर आदींनी यावेळी शेतकर्‍यांच्या भावना व्यक्त केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी सावकार मादनाईक, जयकुमार कोले, सागर शंभुशेटे, अजित पवार, विशाल चौगुले, सागर कोंडेकर, सागर चिपरगे, विक्रम पाटील, सुशील पाटील, वैभव कांबळे, आप्पासाहेब एडके, आण्णासाहेब चौगुले, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.