Sat, Apr 20, 2019 08:09होमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये सुविधा असूनही तरुणीचा मृत्यू?

सीपीआरमध्ये सुविधा असूनही तरुणीचा मृत्यू?

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 12:30AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने पुरेशी खबरदारी न घेता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील केलेल्या शिक्षकांच्या बदल्या आणि त्याविरुद्ध काही शिक्षकांनी दिलेले राजीनामे यांचा परिणाम सीपीआर रुग्णालयातील रुग्ण सेवेवर होऊ लागला आहे. जबाबदारी घेणारे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रविवारी (दि. 1) कीटकनाशक प्राशन केलेल्या एका 21 वर्षीय तरुणीला रुग्णालयात सुविधा असतानाही उपचार मिळू शकले नाहीत. यामुळे पाचवीला पूजलेले आर्थिक दारिद्य्र पाठीशी घेऊन रुग्णासह खासगी रुग्णालयांचे उंबरे झिजविताना एका शेतकरी कुटुंबाची ससेहोलपट झाली. या सर्व प्रकारात रुग्णाचा मृत्यू झाला.

राधानगरी तालुक्यातील टिटवे येथील तरुणी औषध समजून कीटकनाशक प्यायल्याने तिला रविवारी दुपारी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णाच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. अशाप्रकारच्या रुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याच्या घटना अधिक असतात. यासाठी लागणार्‍या चारकोल डायलेसिसची सोयही  उपलब्ध आहे. तथापि हा विभाग सांभाळणार्‍या शिक्षकांची शासनाने मिरजेला बदली केली आणि त्याठिकाणी नव्या व्यक्तीची नियुक्ती झाली नाही. परिणामी जबाबदार व्यक्तीच्या उपस्थिती अभावी संबंधित रुग्णाला उपचार होत नाहीत असे कारण सांगून खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. आर्थिक कुवत नसल्याने खासगी रुग्णालयातील डायलेसिसचे उपचार थांबविण्याची वेळ या कुटुंबावर आली. या घडामोडीत सोमवारी सायंकाळी या तरुणीने आपला प्राण सोडला.  ही घटना गोरगरीब रुग्णांच्या उपचाराच्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजविणारी आहे. 

टिटव्याच्या या कुटुंबियांच्या मालकीची अत्यल्प जमीन आहे.  तरुण मुलीने किटकनाशक प्याल्याचे समजताच कुटुंबियांचे धाबे दणाणले. हे कुटुंब सीपीआर रुग्णालयाच्या आश्रयाला आले होते. तेथे खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाल्यावरुन त्यांनी एका मोठ्या रुग्णालयात रुग्णाला दाखलही केले. पण उपचाराचा खर्च आणि त्याचा अ‍ॅडव्हान्स याची रक्कम ऐकून कुटुंबप्रमुखांचे डोळे फिरले. या मोठ्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने कुटुंबियांची परिस्थिती पाहून तपासणीचे शुल्क घेतले नाही. पण उपचाराचा आकडा ऐकून कुटुंबियांना रुग्णाला एका धर्मार्थ रुग्णालयात हलविण्यावाचून पर्याय उरला नाही. या तरुणीला तात्काळ तेथे दाखल केले. उपचार सुरू झाले. पण उपचारादरम्यान चारकोल डायलेसिस करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. ही सुविधा तेथे उपलब्ध नसल्याने रुग्णाला पुन्हा एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे एक डायलेलिस करण्यात आले. पण त्यासाठी आलेला खर्च रुग्णांच्या नातेवाईकांनी गोळा केलेल्या पैशापेक्षा जास्त असल्याने या रुग्णाला चारकोल डायलेलिसची आवश्यकता असतानाही पुन्हा धर्मार्थ रुग्णालयामध्ये हलविण्यावाचून पर्याय राहीला नाही. तेथे विषारी द्रव्याच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याने संबंधित तरुणीने सायंकाळी शेवटचा श्‍वास घेतला. 

सेवेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात कोणाचे हित?
सुविधा  असतानाही त्याचा लाभ या तरुणीला मिळू शकला नाही. राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयात सध्या शासनाने बदली केलेले आणि राजीनामे दिलेल्या एकूण 15 पैकी केवळ 1 शिक्षक रुजू झाला आहे. अन्य जागा रिक्त असल्याने तेथे जबाबदारी घेण्यास कोण तयार नाही. यामुळे बदली शिक्षकांना रुजू करून घेण्यापूर्वीच येथील सेवेत असलेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्यामध्ये कोणाचे हित लपले होते? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच सुविधा असतानाही जबाबदार व्यक्तीअभावी रुग्णाचा मृत्यू होतो, याची जबाबदारीही निश्‍चित करण्याची वेळ आली आहे.