Sun, Oct 20, 2019 02:33होमपेज › Kolhapur ›

पळा... पळा... बापड्या पुन्हा जीता झाला!

पळा... पळा... बापड्या पुन्हा जीता झाला!

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 2:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

बुधवारी दुपारी साडेतीनची वेळ... कमालीचा उष्मा... सूर्य आग ओकत होता. प्रमुख रस्त्यांसह चौक ओस पडले होते. बसस्थानक आवारात सन्नाटा होता. नेमके याचवेळी बसस्थानक पिछाडीस परीख पुलाजवळ रणरणत्या उन्ह्यात एका व्यक्तीचा मृतदेह बेवारस स्थितीत पडल्याची बातमी पसरली. त्यात खुनाची आवई उठली. त्यानंतर पुन्हा गर्दीत भर पडली. पोलिस आले. शववाहिका दाखल झाली. पंचनाम्याची तयारी सुरू झाली. बापड्याच्या मृत्यूची सार्‍यांची खात्री झाली. कागदोपत्री सोपस्कार सुरू असताना चमत्कार घडला... बापड्या एकदम उठला अन् साईक्स एक्स्टेंशनच्या दिशेने पळत सुटला... 

बापड्या पुढं अन् पोलिस मागं... त्यांच्या मागं बघ्यांची झुंबड... शंभर फूट अंतर पाठशिवणीचा खेळ रंगला. पोलिसांनी बापड्याला धरलं...त्याला पाणी पाजलं... बापड्यानं भरदिवसा कडकडीत उन्ह्यातही मर्यादेपेक्षा जादा ढोसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यासाठी खास मागविलेल्या शववाहिकेतूनच त्याला त्याच्या घरी सहिसलामत सोडलं...

घडलं ते असं... दुपारी साडेतीनच्या सुमाराला शाहूपुरी पोलिसांना वर्दी मिळाली, परीख पुलाजवळ मोकळ्या जागेत चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पडला आहे. कदाचित खुनाची घटना असावी, अशी शक्यता वर्तविण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय मोरे अधिकारी, कर्मचार्‍यांसह स्वत: घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, अशी त्यांची खात्री झाली. काही मिनिटांत शववाहिकाही दाखल झाली. खुनाच्या चर्चेने परिसरात बघ्यांच्या गर्दीत वाढ झाली.

घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हलविण्याची पोलिसांनी तयारी सुरू केली. कर्मचार्‍यांची धावपळ सुरू असतानाच संजय मोरे यांना संशय आला. त्यांनी हाताची नाडी पाहिली; पण कडक उन्ह्यातही  सर्वांग थंडगार... शेवटचा उपाय म्हणून मोरे यांनी तांब्यातून पाणी आणण्यास सांगितले. तोंडावर पाण्याचा शिडकावा करताच बापड्या क्षणार्धात उठला आणि रस्त्याने पळतच सुटला... अगदी शंभरच्या स्पीडने... पळा... पळा... बापड्या पुन्हा जीता झाला... असा कल्लोळ सुरू झाला. बापड्या पुढं तर पोलिस त्याच्या मागं... तर जमावाची झुंबड दोघांच्या मागं.... काही अंतरावर बापड्याला पोलिसांनी धरलं... तोंडाचा वास घेतला असता भरउन्ह्यात त्यानं किमान तीन, चार क्वॉटर्स मारल्याचं निदर्शनास आलं... पोलिसांनी त्याला शववाहिकेत घातलं अन् सरळ  घराकडं त्याची पाठवण केली.