Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Kolhapur › ‘डीबीटी’च्या चर्चेला कृषी आयुक्‍तांकडून पूर्णविराम

‘डीबीटी’च्या चर्चेला कृषी आयुक्‍तांकडून पूर्णविराम

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:11AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शासनाच्या इतर विभागांकडे कृषी विभागासह थेट लाभ अर्थात डीबीटी धोरण लागू असून त्याप्रमाणेच ते राबवायचे, असे खुद्द कृषी आयुक्‍तांनीच जिल्हा परिषदेला पत्र पाठवून स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून खरेदी होणारी कृषी साहित्य खरेदी डीबीटीमुक्‍त केल्याच्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत 2 कोटींची रक्‍कम सेस फंडातून कृषी साहित्याच्या खरेदीसाठी ठेवण्यात आली आहे. 

सेस अर्थात स्वनिधी हा जिल्हा परिषदेचा हक्‍काचा निधी असतो. त्यामुळे याला डीबीटी अर्थात थेट लाभ देण्याचे धोरण लागू करू नये, अशी लोकप्रतिनिधींकडून जोरदार मागणी झाली. जिल्हा परिषदेच्या सभागृहातही तसे ठराव झाले; पण शासनाने याचा जी.आर. काढून यात कोणताही बदल होणार नसल्याचे वारंवार जाहीर केले आहे, तथापि, यवतमाळमध्ये घडलेल्या कीटकनाशक मृत्यू प्रकरणानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेने यांत्रिकीकरण योजना अंमलबजावणीबाबत मागवलेल्या मार्गदर्शनात सेस फंडाला नियम लागू नसल्याचे कृषी आयुक्‍त स्तरावरून जाहीर करण्यात आले होते. तथापि, हा तांत्रिक मुुद्दा असून त्याचा डीबीटीतून वगळण्याशी कांही संबंध नसल्याने स्पष्टीकरण कृषी आयुक्‍तालयानेच दिले आहे. 

त्यामुळे या धोरणावरून कृषी विभागामध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था संपली असून आता मार्चअखेरपर्यंत या रकमेतून खरेदी आणि लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठीची यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत 2 कोटींचा सेस आहे. गेल्या वर्षीसाठीची एक कोटीची असलेली तरतूद विनाखर्च राहिली आहे. निवडणुकांची आचारसंहिता, डीबीटी धोरणावरून शेतकर्‍यांमध्ये असणारी अनास्था आणि नोटाबंदी यामुळे वर्षभर शेतकर्‍यांनी योजनेकडे पाठच फिरवली होती. आता गेल्या वर्षीचे 1 कोटी आणि यावर्षीचे 1 कोटी असे 2 कोटी रुपये मार्चपर्यंत खर्च करावे लागणार आहेत, त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले 
आहे. 

सेसमधून 50 टक्के अनुदानावर शेतकर्‍यांना इलेक्ट्रिक मोटार पंप, डिझेल व रॉकेल इंजिन, ताडपत्री, पीव्हीसी पाईप, चापकटर, स्पेपंप आदी कृषिपूरक साहित्य दिले जाते.