Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Kolhapur › ‘दौलत’ चालवण्यास सतेज पाटील घेणार?

‘दौलत’ चालवण्यास सतेज पाटील घेणार?

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 12:06AMचंदगड ः प्रतिनिधी

45 वर्षांपासून शेतकर्‍यांच्या विकासात भर पाडणारा दौलत साखर कारखाना गोकाकच्या न्युट्रियन्स कंपनीने एक वर्ष गळीत हंगाम घेतल्यानंतर दुसर्‍या वर्षी बंद ठेवला. दि. 30 जून रोजी न्युट्रियन्स कंपनीचा करार जिल्हा बँकेचे हप्ते थकवल्याच्या कारणावरून संपुष्टात येणार आहे. नवीन तीन कंपन्या कारखाना घेण्यासाठी सरसावल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आमदार सतेज पाटील यांचे नाव खासगीत बोलले जात आहे. पाटील यांची आर्थिक बाजू कणखर असल्याने ते कारखाना यशस्वीपणे चालवू शकतील, असा अंदाज शेतकरी व्यक्‍त करत आहेत. त्यामुळे सभासद आणि कामगारांना पुन्हा एक आशेचा किरण दिसत आहे. सतेज पाटील यांच्याबरोबर जिल्हा बँक तसेच चंदगड तालुक्यातील प्रमुख नेत्यांबरोबर गुप्त चर्चा झाल्याचे अधिकृत समजते. 

 दौलत बंद असल्याचा गैरफायदा इतर कारखान्यांनी घेतला आहे. हंगाम संपून सहा महिने उलटले तरी गळितास गेलेल्या उसाची बिले मिळाली नाहीत. दौलत साखर कारखाना प्रशासनाने बिले बुडवली, कारखाना बंद पाडला. जिल्हा बँकेने तारणावर घेतलेली 44 हजार क्‍विंटल साखर शेतकरी व कामगारांच्या बिलासाठी गोदामात पडून राहिली आहे. जिल्हा बँकेकडे न्युट्रियन्स कंपनीने 34 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. शेतकर्‍यांची सात कोटी ऊस बिले, दहा कोटी कामगारांचे पगार आणि पाच कोटी तोडणी वाहतूकदारांची बिले असे सुमारे 22 कोटी रुपये देण्याची अट असताना जिल्हा बँकेने करार रद्द करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. या सर्व आव्हानांना आमदार सतेज पाटील यांना सामोरे जावे लागणार आहे.