Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सासर्‍याच्या हल्ल्यात सुनेचा मृत्यू

सासर्‍याच्या हल्ल्यात सुनेचा मृत्यू

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 1:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून माथेफिरू सासर्‍याने सुनेसह दोन चिमुरड्या नातवांवर कोयत्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात शुभांगी रमेश सातपुते (वय 32) यांचा मृत्यू झाला. नातू मयुरेश (8), कनिष्का (4) गंभीर जखमी झाले. कनिष्काच्या डोक्यावर वर्मी हल्ला झाल्याने प्रकृती चिंताजनक आहे. मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथील मध्यवर्ती बाजारपेठेत बुधवारी सकाळी थराराक घटना घडली.

यावेळी झालेल्या झटापटीत संशयित हल्लेखोर पांडुरंग दशरथ सातपुते (70) जखमी झाला आहे. गंभीर अवस्थेतील दोन्हीही नातवांसह त्यालाही येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माथेफिरूने सुनेचे दोनही हात कोयत्याने कोपरापासून तोडले आहेत. कोयत्याचे 27 खोलवर वार करून माथेफिरूने सुनेच्या शरीराची चाळण केली आहे.

 गळा, पाठीवर अनेक ठिकाणी वर्मी वार केले आहेत. अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या मातेला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या मयुरेश, कनिष्कावर संशयिताने कोयत्याने वार केले.

गंभीर अवस्थेतील महिलेसह मुले, संशयिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती चिंताजनक बनल्याने राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. कनिष्काची प्रकृती गंभीर बनल्याने दुपारी तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

संशयित हल्लेखोर पांडुरंग सातपुते, सासू शांताबाई (60) यांच्याविरुद्ध कळे (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. हल्ल्यात वापरलेला कोयताही हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, संशयित पांडुरंग सातपुते याचा चर्मकार व्यवसाय असून काहीकाळ त्याचे मुंबईत वास्तव्य होते. पाच वर्षांपूर्वी पांडुरंग मूळगाव मल्हारपेठ येथे स्थायिक झाले. पत्नी शांताबाई, मुलगा रमेश, सून शुभांगी व दोन नातवांसह चार वर्षांपूर्वी नव्याने बांधलेल्या तीन मजली बंगल्यात राहू लागले. मुलगा रमेशने कोल्हापूरसह परिसरात पादत्राणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

सहा महिन्यांपासून सासरा पांडुरंग व सून शुभांगी यांच्यात कौटुंबिक कारणातून मतभेद निर्माण झाले. यावेळी सासर्‍याने सुनेला काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमीही केले होते. तथापि, काही मंडळींनी कौटुंबिक वादात समेट घडविला होता.

आठ दिवसांपासून वाद
सातपुते कुटुंबीयांतील मतभेद आठ दिवसांपासून पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. मंगळवारी दुपारी, रात्री उशिरापर्यंत भांडणे सुरू होती. संशयित पांडुरंग व मुलगा रमेश यांच्यात किरकोळ कारणातून पुन्हा वादावादी झाली.

सासर्‍यासह सासूनेही सुनेला शिवीगाळ केली
रमेशला सकाळी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे लवकर जायचे होते. त्याने पत्नी शुंभागीला अंघोळीसाठी पाणी गरम करण्यास सांगितले. पाणी तापविल्यानंतर संशयित, त्याची पत्नी शांताबाई या दोघांनी रमेश व त्याच्या पत्नीशी वाद घातला. अंघोळीसाठी गरम पाणी मला प्रथम देण्याऐवजी रमेशला का दिलेस, यावरून सुनेशी हुज्जत घातली.

सुनेचे दोन्हीही हात कोयत्याने तोडले
रमेश गडबडीत अंघोळ करून बांबवडेकडे रवाना झाला. त्यानंतर सासर्‍याने सुनेला शिवीगाळ करून कोयत्याने सुनेवर हल्ला केला. हल्ला चुकविण्याचा प्रयत्नात सुनेच्या हातावर सपासप वार झाले.

जखमी मातेला बिलगलेल्या चिमुरडीच्या डोक्यात वार
मातेने फोडलेल्या किंचाळीमुळे खोलीत झोपलेले मयुरेश व कनिष्का धावत आले. रक्ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या मातेला वाचविण्यासाठी चिमुरड्याने आजोबाच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नातवाला भिंतीकडे ढकलून देत डोक्यावर त्याच कोयत्याने हल्ला केला. जखमी मातेला बिलगलेल्या कनिष्काच्याही डोक्यावर कोयत्याने वार केले. मातेसह दोन कोवळी मुले रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेली होती.

सरपंचांसह ग्रामस्थ मदतीला धावले
मल्हारपेठचे सरपंच सीताराम सातपुते, त्यांची पत्नी व ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संशयित पांडुरंग दारात थांबला होता. तरुणांनी त्याच्याकडील रक्ताळलेला कोयता काढून घेतल्यानंतर तीनही जखमींना उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले. झटापटीत हल्लेखोराच्या पायालाही इजा झाली आहे.

वरिष्ठाधिकार्‍यांची घटनास्थळी भेट
शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माथेफिरूच्या कृत्यामुळे पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रमेशच्या आक्रोशाने रुग्णालय गहिवरले
दवाखान्यात पत्नीच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच रमेशला रडू कोसळले. त्याच्या आक्रोशामुळे रुग्णालय परिसर गहिवरला. नातेवाईक, ग्रामस्थांकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत होती.