Wed, Jun 26, 2019 11:42होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक मारू : दसरा चौकात विराट सभेत सरकारला निर्वाणीचा इशारा

संयम संपला, आणखी अंत पाहू नका

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:57AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर 58 मूक मोर्चे काढले, मुंबईत महामोर्चा काढला; पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. याच मागणीसाठी गेली 17 दिवस कोल्हापूरसह महाराष्ट्रात ठिय्या आंदोलन सुरू आहे, त्याचीही सरकार दखल घेणार नसेल, तर आता आमचा संयम संपला आहे, त्याचा अंत पाहू नका, अशी गर्जना करतानाच यापुढे मुंबईत धडक देऊ, असा इशारा गुरुवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या विराट सभेत देण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून, कोल्हापूर बंदची हाक मोर्चाच्या वतीने देण्यात आली होती. शहरातील विविध भागातील तरुणांनी रॅली काढून शहरातील व्यवहार बंद केले. त्यानंतर तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे दसरा चौकात येऊ लागले. याच दसरा चौकात या जथ्थ्यांचे विराट सभेत रूपांतर झाले. सुरुवातीला वीरमातांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व शाहिरी पोवाड्याने सभेला सुरुवात झाली. शाहीर आझाद नायकवडी, रंगराव पाटील, दिलीप सावंत यांनी शाहू गौरव गीत, महाराष्ट्र गीत व मराठा गीत सादर केले.

प्रास्ताविक आंदोलनाचे समन्वयक दिलीप देसाई यांनी केले. यावेळी वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, प्रा. जयंत पाटील, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे यांची भाषणे झाली.   
बहुतांश वर्ग दुर्बल : डॉ. थोरात

‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात म्हणाले, शांतता, सुरक्षितता, शिक्षण व रोजगार या माणसाच्या मूलभूत मागण्या असतात. या मागण्या पूर्ण झाल्या, तर सामाजिक शांतता राहते, नाहीतर अशांतता व असुरक्षितता वाढते. शासन व सामान्य माणसातील दुरावा वाढला, तर संघर्ष वाढतो, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. तशीच परिस्थिती मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत झाली आहे. ‘नाबार्ड’चा अध्यक्ष असताना ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र मी जवळून पाहिले आहे.मराठा समाजातील एक वर्ग सधन तर शिक्षण, रोजगार न मिळाल्याने बहुतांश वर्ग दुबळा झाल्याचे दिसले. 

युद्ध जिंकायचे आहे...

ते म्हणाले, जनता व सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला, तर तो रोखण्यासाठी प्रयत्न राज्यकर्त्यांनी केले पाहिजेत. बहुजन समाजाच्या मतांवर सत्तेत आलेल्या सत्ताधार्‍यांनो त्यांचा आवाज ऐका, त्यांच्या मागणीची नोंद घ्या. प्रतिसंघर्ष हा प्रचंड शक्‍ती निर्माण करतो, मग कोणाला रोखणे नेत्यांच्या हातात रहात नाही. आज एकवटलेला समाज शिवाजी महाराजांच्या भगवा ध्वज हातात घेऊन आला असेल, तर त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. आपणही मागणी मान्य झाली म्हणजे फक्‍त लढाई जिंकली; पण आपल्याला युद्ध जिंकायचे आहे. आपल्यापेक्षा गरीब आणि शेवटच्या घटकाला शिक्षण, रोजगाराची हमी मिळेपर्यंत हे युद्ध सुरू ठेवावे लागेल

मराठा वादळ आता सुरू झाले आहे : डॉ. जाधव
 

डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, आतापर्यंत 58 मोर्चे शांततेत काढण्यात आले. मुंबईतील मोर्चाला मी आणि शाहू महाराज उपस्थित होतो. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे मूक मोर्चे म्हणजे वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. मराठा हा लढवय्या आहे. आता हे वादळ सुरू झाले आहे.  

- तर 1980 लाच आरक्षण मिळाले असते

डॉ. जाधव म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जून 1902 ला आपल्या संस्थानात 50 टक्के आरक्षण दिले होते. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता; पण ते आरक्षण कमी पडते, असे शाहू महाराज यांना वाटले. त्यानंतर 1920 ला पुन्हा आरक्षणात वाढ करून ते 90 टक्के केले. परंतु, ते फक्‍त कोल्हापूर संस्थानापुरते मर्यादित राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आरक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता; पण त्यावेळी महात्मा गांधी उपोषणाला बसले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले. अखेर एससी व एसटी प्रवर्गाला 20 टक्के आरक्षण मिळाले. आणखी कोणते असे वर्ग आहेत की त्यांना आरक्षणाची गरज आहे, याचा अभ्यास करण्यासाठी 1978 ला मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. परंतु, दुर्दैवाने मंडल आयोगाने अभ्यास केला नाही.

1931 च्या जनगणनेनुसार 52 टक्के आरक्षण द्यायला हरकत नाही, असा अहवाल दिला. त्यानुसार 1980 साली ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळाले. वास्तविक त्याचवेळी मराठा समाजालाही आरक्षण मिळाले असते. कै. अण्णासाहेब पाटील, मराठा महासंघाचे शशिकांत पवार, पुरुषोत्तम खेडेकर आम्ही सर्व जण मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी गेली कित्येक वर्षे करत आहोत, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, राज्यात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अकरा मराठा मुख्यमंत्री लाभले. परंतु, त्यापैकी कोणालाच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे का वाटले नाही? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, ते न्यायालयात टिकले नाही. 

तामिळनाडूत आजही पेरियार समाजाला आरक्षण

डॉ. जाधव म्हणाले, 1989 ला तामिळनाडूतील पेरियार समाजाने आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन केले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी तज्ज्ञांची समिती नेमली होती. अखेर जयललिता यांनी ओबीसी प्रवर्गात पेरियार समाजाचा समावेश करून ओबीसी आरक्षण 50 टक्क्यापर्यंत वाढवले. त्यानुसार अध्यादेश काढून तामिळनाडू विधिमंडळ अधिवेशनात कायदा केला. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना विनंती करून घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये त्याचा समावेश करायला लावले. त्यामुळे त्या आरक्षणाला न्यायालय हात लावू शकले नाही. अशाप्रकारे पेरियार समाजाला आरक्षण देण्यात आले. तामिळनाडूत आजही पेरियार समाजाचे आरक्षण सुरू आहे. पेरियार समाजाला जर आरक्षण मिळते, तर त्याच परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट करून मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही? घटनेच्या 340 कलमाप्रमाणे मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीची गरज आहे, ती प्रक्रिया लवकर पूर्ण करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही डॉ. जाधव यांनी केली.

आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही

पूर्वी आरक्षणाची गरज वाटली नाही. कारण त्यावेळी शेती होती. परंतु, आता शेती विभागली गेली, वाटण्या झाल्या, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, सरकारला एवढेच सांगायचे आहे की, आतापर्यंत मराठा समाजाची शांतता, संयम पाहिला. मूक मोर्चा पाहिला; पण आता ‘मूक’ हा शब्द खोडला असून त्या ठिकाणी ‘ठोक’ शब्द केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. आम्हाला आरक्षण दिलेच पाहिजे. ते कसे बसवायचे? तज्ज्ञांची मदत कशी घ्यायची? ती तुमची जबाबदारी आहे, आमची नाही, असेही डॉ. जाधव यांनी ठणकावून सांगितले. तुम्ही काय करायचे ते करा, परंतु आरक्षण द्या. नाहीतर यापुढे कोणतेही सरकार असू दे, आरक्षण दिले नाही तर गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

आरक्षण मागतोय, भीक नाही

मराठा समाज हा 40 टक्के आहे, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले, आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे. आर्थिक, शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षण पाहिजे. आम्ही आरक्षण मागतो म्हणजे तुमच्याकडे भीक मागत नाही. आम्ही आमच्या हक्‍काचे आरक्षण मागत आहोत. तुम्ही आरक्षण दिले नसल्याने नाईलाजाने आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. सरंजामदार लोकही आता मोर्चासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे मराठा समाज आता कुणाचेही ऐकणार नाही. कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. चर्चा वगैरे करू नका. 

तुटेपर्यंत ताणू नका : डॉ. जाधव यांचा इशारा

जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहील. आमच्या हक्‍काचे आरक्षण आहे. ते दिले नाही तर हिसकावून घ्यावे लागेल, असा इशारा देऊन डॉ. जाधव म्हणाले, प्रशासन, सरकारला सांगू इच्छितो, लाखो मराठ्यांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. हा आवाज तुम्ही ऐका. आज जागे व्हा. अजूनही जागे व्हा. अजूनही आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहे. सनदशीर मार्गाने जात आहोत; पण प्रत्येकालाच एक मर्यादा असते. कोणतीच गोष्ट तुटेपर्यंत ताणू नका. तुटली तर ती कुणाच्याही हातात थांबणार नाही, असा इशाराही डॉ. जाधव यांनी दिला. 

मराठी हे लढवय्ये... 

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी मिलिटरीत इतर कोणत्याही जातीच्या नावे रेजिमेंट काढली नाही. परंतु, मराठा रेजिमेंट काढली. कारण त्यांना मराठा हे लढवय्ये आहेत, हे माहिती होते. त्यामुळे मराठा जात ही लढावू आहे. एका मराठ्यामध्ये लाख लोकांची शक्‍ती आहे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.  

चार वर्षांत निर्णय का नाही? : शाहू महाराज
 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात 58 मूक मोर्चे काढण्यात आले; पण राज्य शासनाला जाग आली नाही. त्यामुळेच या मूक मोर्चाचे ठोक मोर्चात रूपांतर झाले आहे. अजूनही शासनाने आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा शाहू महाराज यांनी दिला.

राजकीय हेतूसाठी नाही तर शिक्षण व नोकरीत योग्य प्रमाणात व योग्यप्रकारे आरक्षण मिळावे, यासाठी आपला हा लढा सुरू असल्याचे सांगून शाहू महाराज म्हणाले, आज संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाचा हा आवाज राज्यकर्त्यांना ऐकावा लागेल. तसे केले नाही, तर काय होईल ते सांगता येत नाही. मराठा समाजाला मागासवर्गीय, मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे.  आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध व वचनबद्ध आहोत, असे म्हणतात. मग चार वर्षांत आरक्षणावर का निर्णय घेतला नाही, तुम्हाला पाठिंबा तर सर्वांचा आहे, विरोध कोणाचा आहे ते सांगावे, असा सवाल शाहू महाराज यांनी केला. 

तत्काळ निर्णय घ्या

मराठा सामाजाच्या आरक्षणाचा विचार पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल, यात शंका नाही; पण नाहीच पोहोचला तर आपल्या पद्धतीने हा आवाज पोहोचवावा लागेल, असे सांगून शाहू महाराज म्हणाले, महाराष्ट्रात व देशात एकच शासन असताना आपली जी रास्त मागणी आहे, ती मान्य का होत नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. म्हणूनच आज या ठोक मोर्चाच्या माध्यमातून त्यांना इशारा देऊ की, कोणाचीही वाट न पाहता आरक्षणाबाबत तत्काळ निर्णय घ्या. मराठा समाजाच्या व्यथा राज्यकर्त्यांनी जाणून घ्याव्यात. शासनाने चार वर्षांत काही केले नाही. या वर्षभरात आरक्षणासाठी अनुकूल पावले उचलतील का नाही, तेही माहीत नाही. म्हणून आज जरी या आंदोलनात असलो, तरी आरक्षणाच्या पुढच्या तयारीसाठी आपण आतापासूनच सज्ज असले पाहिजे.

शासन आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट पहात आहे; पण तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्हाला कोणाची वाट पहायची गरज नाही, असे सांगून शाहू महाराज यांनी, मराठा समाजाच्या संयमाची वाट पाहू नका, संयमाचा अंत पाहू नका. समाज शांत आहे म्हणूनच मूक मोर्चे काढले. आपल्या देशाची घटना मजबूत आहे. घटनेत दुरुस्तीची तरतूद आहे. ती उद्ध्वस्त करण्याची तरतूद नाही. म्हणून केंद्रात व राज्यात एकच शासनकर्ते असून, त्यांना घटनेत योग्य ते बदल करण्याचे अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. केवळ आरक्षण देऊन उपयोग नाही, तर आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला प्रत्यक्ष मिळणे गरजेचे आहे. आरक्षणासाठी राज्य शासन काही अवधी मागत आहे; पण या कालावधीत ते काय करतील, हे माहीत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

दबाव कायम ठेवणे आवश्यक : डॉ. पवार

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, मराठा समाज शांतताप्रिय व संयमी आहे. म्हणून सरकारने मराठा समाजाबद्दल गैरसमज करून घेऊ नये. मराठा आरक्षण देण्यात सरकारने आतापर्यंत खूप वेळ घालवला, तो घालवायला नको होता. त्यामुळे मूक मोर्चाचे रूपांतर आता ठोक मोर्चात करावे लागले आहे. सामाजिक न्यायाचा विचार देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण दिले. तीच सामाजिक न्यायाची भूमिका आता आपण शांततेने मांडत आहोत. त्यासाठी ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत आंदोलन सुरू ठेवले आहे, त्याचा सरकारवर दबाव आहे.

सरकारवरील हा दबाव कायम ठेवण्यासाठी आंदोलनात आपण सातत्य ठेवणे आवश्यक आहे. ते काम यापुढील काळात आपण सर्वांनी मिळून करू या. मात्र, हेे करत असताना तरुणांनी गडबड, दंगा करून उपयोग नाही. कारण आपल्या हातून जर काही वाईट कृत्य घडले, तर समाजात तो चुकीचा संदेश जाईल.  त्याची काळजी आपण सर्व मराठा बांधवांनी घेतली पाहिजे. पोलिस आपली काळजी घेण्यासाठीच आहेत. ते आपल्याला काही करणार नाहीत. औरंगजेबाविरुद्ध मराठे 27 वर्षे लढले. त्यात अनेक मराठे हुतात्मे झाले; पण एकाही मराठ्याने आत्महत्या केली नाही. मराठा आरक्षणासाठी आणखी काही दिवस आपणास लढा द्यावा लागणार आहे. लढत असताना कोणीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये. आतापर्यंत आपण शांततेने, संयमाने आंदोलन केले आहे. त्याच पद्धतीने आजच्या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अहवालाबाबत जागरूकता आवश्यक : प्रा. पाटील

प्रा. जयंत पाटील म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण हे मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर अवलंबून आहे, तिथेच आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. वर्षभर आयोगाने पुरावे गोळा केले आहेत, अहवाल सादर करण्यासाठी त्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे; पण आयोगाने तत्पूर्वीच अंतरिम अहवाल लोकांसाठी जाहीर केला पाहिजे. आलेल्या पुराव्यावरून मराठा समाज मागास आहे का नाही, हे आयोगाने अंतरिम अहवालात सांगितले पाहिजे, जर आयोगच विरोधात असेल, तर त्यात सुधारणा करता येईल; पण तसाच अहवाल दिला, तर आरक्षण मिळणार नाही. यासाठी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी जागरूक राहूून हा अहवाल न्यायालयात सादर होण्यापूर्वी अंतरिम स्वरूपात तो लोकांना उपलब्ध करून द्यावा. 

अब जंगही होगी 

शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही, असे दिसते. अब जंगही होगी, त्यासाठी तयार रहा. आज सोशल मीडिया बंद केला, उद्या टीव्ही, पेपरही बंद करा; पण मराठ्यांचे हे वादळ आता थांबणार नाही, कारण हा मराठा पेशव्यांचा नाही, पेशव्यांनी सांगितले आणि आम्ही ते ऐकले, असे होणार नाही. आता ठोक येऊ, असा इशारा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिला. 

आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच

मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाचा अंतिम टप्पा आला आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवायचेच, या ध्येयाने आंदोलनकर्ते कामाला लागले आहेत. लोकशाही मार्गाने काढण्यात आलेल्या ‘मूक’ मोर्चाची जागा आता ‘ठोक’ मोर्चाने घेतली आहे. बेमुदत ठिय्या आंदोलनासह विविध प्रकारची आंदोलने सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून दसरा चौकात क्रांतिदिनी झालेल्या ‘मराठा आरक्षण सभेत’ आंदोलकांनी आरक्षण देण्यास विलंब करत असणार्‍या सरकारविरोधात संतप्‍त भावना व्यक्‍त करत, आरक्षण मिळेपर्यत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संयोजकांन