Fri, May 24, 2019 08:40होमपेज › Kolhapur › पाणी देणारच नाही; वारणाकाठच्या रणरागिणी कडाडल्या

पाणी देणारच नाही; वारणाकाठच्या रणरागिणी कडाडल्या

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 12:58AMदानोळी : वार्ताहर

वादातीत असलेल्या इचलकरंजीच्या अमृत योजने विरोधात  हळदी-कुंकू आणि एक चिमणी रॉकेल द्या अशी साद घालत बोलावलेली  महिलांची पहिली बैठक येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुजाता शिंदे होत्या. उपस्थित महिलांनी आपल्या शैलीत अनेकांची हजेरी घेत, पाणी देणारच नाही असे ठणकावले. 

यावेळी बोलताना सरपंच शिंदे म्हणाल्या, वादातीत असलेल्या इचलकरंजीच्या अमृत योजनेला वारणा काठावरील गावांतून विरोध आहे.  पुरुष मंडळींनी वारणा बचाव कृती समिती स्थापून गाव बंद, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, उपोषण आदी आंदोलनांतून विरोध केला आहे.  जिल्हाधिकार्‍यांनी या योजनेला त्वरित स्थगिती द्यावी असा अहवालही  मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. तरीसुद्धा शासन वारणाकाठच्या जनतेच्या मागण्यांची दखल घेत नाही.  वारणेचे पाणी शिवारात फिरले तर भविष्यात आम्हाला चांगले दिवस येतील. आमच्या मुला-बाळांना शेतीतून आपला उदरनिर्वाह करता येईल  म्हणून आम्ही आमच्या सुपीक जमिनी प्रकल्पग्रस्तांना दिल्या. आमच्या घासातील घास देऊन त्यांना राहण्यासाठी आमच्या गावातही वाटणी दिली. 

पण शासन आमच्या  हक्काचे पाणी अगोदरच दोन नद्यांचे पाणी पित असलेल्या शहराला देत आहे. म्हणून आम्ही वारणाकाठावरील महिला या आंदोलनात उतरत आहोत. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी वारणा नदी वाचली पाहिजे.  वारणा नदीचे पाणी न्यायला येणार्‍याना पहिली महिलांनी उपस्थित  केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.  कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नाही, असे या बैठकीच्या माध्यमातून  ठणकावत पुढल्या बैठकीत संपूर्ण वारणाकाठावरील हजारो महिलांना बोलावून निर्णय घेऊन विरोधाची भूमिका आणि रणनीती ठरवली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. 

यावेळी आमदार हाळवणकर यांनी वडगाव येथील सभेत  काढलेल्या नदीवर हक्क सांगणारी विद्वान मंडळी दानोळीत आहेत या उद‍्गाराचा महिलांच्या भाषेत निषेध करण्यात आला. यावर बोलताना रंजना राऊत म्हणाल्या, दानोळी किंवा वारणाकाठ नदीवर हक्क सांगत नाही, तर लवादात ठरलेल्या किती आणि कोणती उद्दिष्ट  पूर्ण झाली आहेत, हे या विद्वानांना माहीत नसलेने अशी बेताल वक्तव्ये होत आहेत. पहिली ठरलेली उद्दिष्टे पूर्ण करा, मगच पाण्यासाठी दानोळीत पाय ठेवा. नाहीतर गाठ वारणाकाठच्या रणरागिणींशी आहे.     
यावेळी संगीता तिवडे यांनी आपल्या मनोगतात शासन आणि योजना समर्थक यांचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, योजना राबवणारच म्हणणारे पालकमंत्री फक्त इचलकरंजीचे पालक नाहीत. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन वक्तव्य करायला हवं होतं. पालकांना पालकाची भाषा करावी, मालकाची नको. सर्व महिलांना सांगून ठेवते, दारामागं ठेंगडी काढून ठेवा, कोण पाणी न्ह्यायला येतोय बघुयाच. 

यावेळी नंदिनी शिंदे, कल्पना पिसे, रेखाताई बोरचाटे, रंजना राऊत, मेघमाला भोसले, इंदुमती गावडे, रुक्साना नदाफ, मीना कदम, संगीता तिवडे, इंदूबाई पोवार, नाझनीन जावेद नदाफ, सुजाता भास्कर कांबळे, शमाबानू राजेखान मुजावर, रेखा मंडले, सुवर्णा निकम, शबाना शिकलगार, शोभा साळोखे, कल्पना मंडले, सुजाता भोसले यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.